Team India Playing 11 Prediction: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही दोन्ही संघांमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यात कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग ११? जाणून घ्या.

भारतीय खेळाडू आतापर्यंत तरी दमदार कामगिरी करत आहेत. पण नंबर १ खेळाडूंनी भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं आहे. टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर १ स्थानी असलेले अभिषेक शर्मा आणि गोलंदाज वरुण चक्रवर्ती आऊट ऑफ फॉर्म आहेत. पण भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा डावाची सुरूवात करताना दिसेल. तर वरुण चक्रवर्तीचा पत्ता कट होऊ शकतो.

या महत्वाच्या सामन्यासाठी वरुण चक्रवर्तीच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. अभिषेक शर्माला संघाबाहेर करणं भारतीय संघाला परवडणारं नाही. कारण तो जर बाहेर झाला तर पूर्ण फलंदाजीक्रम बदलेल. तसेच तो जर चमकला तर याहून चांगली सुरुवात भारतीय संघाला मिळू शकणार नाही. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती. सलामीला आलेला अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतला होता. पण त्यानंतर संजू सॅमसनने भारतीय संघाचा डाव सांभाळला. संजूने ८९ धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने देखील दमदार खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला होता.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग ११: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती/ कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग</p>