India vs Pakistan, Playing XI Prediction: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात नामिबियावर विजय मिळवला. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर तिसरा सामना जिंकून भारतीय संघाकडे सुपर ८ फेरीत प्रवेश करण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग ११? जाणून घ्या.

कुलदीप यादवला संधी मिळणार का?

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी भारतीय संघाची प्लेईंग ११ कशी असेल याबाबत भविष्यवाणी केली आहे. आकाश चोप्राने सांगितलं की, आर प्रेमदासा स्टेडियमवरील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजासाठी फायदेशीर ठरू शकते. गेल्या काही सामन्यांमध्ये हेच पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अर्शदीप सिंगला प्लेईंग ११ मधून विश्रांती दिली जाऊ शकते. तर कुलदीप यादवला प्लेईंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.

भारत- पाकिस्तान सामन्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्मा खेळणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे संजू सॅमसनला विश्रांती दिली जाऊ शकते. आकाश चोप्राच्या मते, भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये आणखी एक मोठा बदल केला जाऊ शकतो. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरचं पुनरागमन होणार आहे. त्यामुळे रिंकू सिंगला विश्रांती दिली जाऊ शकते. सुंदर फिरकी गोलंदाजी करण्यासह फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. कोलंबोची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान देणं हे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकतं. कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती हे प्रमुख फिरकी गोलंदाजांच्या भूमिकेत असणार आहे. या दोघांना अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळू शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग ११:

अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.