Team India Record: आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर एका विजयासाठी संघर्ष करताना दिसून येत होता. पण झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाला सूर गवसला आहे. पहिल्या टी-२० सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने विजयाची लय कायम ठेवली आहे. २२० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेचा डाव १२९ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ९० धावांनी आपल्या नावावर केला आहे. दरम्यान भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी २२० धावांचा डोंगर सर करायचा होता. या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रायन बेनेटने वेगवान सुरुवात करुन दिली. त्याने ३२ धावा चोपल्या. पण पदार्पणवीर यश ठाकूरने त्याला बाद करत माघारी धाडलं. तर बेन करन १, डियोन मायर्स १२,रायन बर्ल २०, सिकंदर रझा शून्यावर माघारी परतला. तर वेस्ली मधेवेरेने २४ धावांचे योगदान दिले. शेवटी ब्रॅड इव्हान्सने १९ धावांची खेळी केली. दरम्यान झिम्बाब्वेचा डाव अवघ्या १२९ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ९० धावांनी आपल्या नावावर केला. हा सामना कर्णधार श्रेयस अय्यरसाठी अतिशय खास आहे. कारण टी-२० कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच मालिकाविजय आहे. यासह हा भारताचा झिम्बाब्वेविरुद्ध दुसरा सर्वात मोठा विजय आहे.
याआधी २०२४ मध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने १०० धावांनी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ९० धावांनी विजय मिळवला आहे. तर याच वर्षी चेन्नईत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय मिळवला होता. हा विजय टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना मिळवला होता.
भारतीय संघाने उभारला २१९ धावांचा डोंगर
या सामन्यात झिम्बाब्वेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्मा अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. तर वैभव सूर्यवंशीने २० धावांची खेळी केली. सुरुवातीला २ धक्के बसल्यानंतर, इशान किशन आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. इशान किशनने ८१ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने २५ धावा केल्या. तिलक वर्मा शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने नाबाद ० धावांची खेळी केली. भारतीय संघाने २० षटकांअखेर ५ गडी बाद २१९ धावा केल्या.
