Team India Highest Total In ICC T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत गुरूवारचा दिवस भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण याच दिवशी दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज आणि भारत विरूद्ध झिम्बाब्वे असा सामना होणार होता. दोन्ही सामने सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चारही संघांसाठी अतिशय महत्वाचे होते.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि भारताचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग आणखी सोपा केला. भारतीय संघाला केवळ झिम्बाब्वेविरूद्ध विजय मिळवायचा होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली.

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. भारताने २० षटकांअखेर ४ गडी बाद २५६ धावा केल्या. ही या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम आता भारतीय संघाच्या नावे नोंदवला गेला आहे. भारतीय संघाकडे सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम करण्याची संधी होती. पण हा विक्रम अवघ्या ४ धावांनी हुकला. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा रेकॉर्ड हा श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने २००७ मध्ये केन्याविरूद्ध झालेल्या सामन्यात ६ गडी बाद २६० धावा केल्या होत्या.

टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारे संघ

श्रीलंका (२००७)- ६ गडी बाद २६० धावा विरूद्ध केन्या
भारत (२०२६)- ४ गडी बाद २५६ धावा विरूद्ध झिम्बाब्वे
वेस्ट इंडिज (२०२६)- ६ गडी बाद २५४ धावा विरूद्ध झिम्बाब्वे
आयर्लंड (२०१६)- ५ गडी बाद २३५ धावा विरूद्ध ओमान

भारतीय संघाने उभारला धावांचा डोंगर

या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठा बदल करण्यात आला होता. भारताकडून सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने या डावात चांगली सुरूवात करून दिली. त्याने अर्धशतकी खेळी केली. अभिषेकने ५५ धावा केल्या. तर संजू सॅमसनने २४ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इशान किशनने ३८ धावांची खेळी केली. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने ३३ धावा केल्या. शेवटी हार्दिक पांड्याने नाबाद ५० आणि तिलक वर्माने नाबाद ४४ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ४ गडी बाद २५६ धावांवर पोहोचवली.