भारतीय संघाचा यजमान न्यूझीलंडने चांगलाच धुव्वा उडवला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. यामुळे वन-डे मालिके पाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला.

पहिल्या कसोटीत भारताला १० गडी राखून धूळ चारणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत ७ गडी राखून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियावर विजय मिळवला. एकदिवसीय सामन्यापाठोपाठ कसोटी सामन्यात पराभूत करून न्यूझीलंडने भारताला दौऱ्यातील दुसरा ‘व्हाईटवॉश’ दिला. पण या लाजिरवाण्या पराभवानंतरदेखील भारतासाठी एक ‘गुड न्यूज’ आहे.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिला मालिका पराभव स्वीकारून देखील भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवून आहे. भारताने ९ पैकी ७ कसोटी सामने जिंकत ३६० गुणांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. तर ऑस्ट्रेलियाने देखील १० पैकी ७ कसोटी सामने जिंकून २९६ गुणांसह आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. या गुणतालिकेत भारताला पराभवाचा धक्का दिल्याने न्यूझीलंडचा संघ ७ पैकी ३ सामने जिंकून १८० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

पाहा गुणतालिका –

अशी रंगली दुसरी कसोटी

भारत आणि न्यूझीलंड यांचा पहिला डाव काहीसा बरोबरीत सुटल्यानंतर भारताचा दुसरा डाव न्यूझीलंडने १२४ धावांत गुंडाळला. दुसऱ्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावांपर्यंत मजल मारलेल्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवशीही खराब सुरुवात झाली. हनुमा विहारी टीम साऊदीच्या गोलंदाजीवर वॉटलिंगकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर ऋषभ पंत, मोहम्मद शमी हे फलंदाजही एकामागोमाग एक माघारी परतले. रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

न्यूझीलंडला विजयासाठी मिळालेल्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने सामना जिंकला. टॉम लॅथमने ५२ तर टॉम ब्लंडलने ५५ धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यावर अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकल्स यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.