Team India Semi Final Scenario : भारतीय संघाने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली. पण सुपर ८ मध्ये एक सामना गमावल्यानंतर भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. भारतीय संघाला सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर भारतीय संघाचं सेमी फायनलमध्ये जाण्याचं समीकरण आणखी कठीण झालं आहे.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर १०० हून अधिक धावांनी विजय मिळवला. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या नेट रन रेटमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. भारतीय संघ अजूनही सेमी फायनलच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. दरम्यान सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

पहिलं समीकरण

भारतीय संघाला जर सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, दक्षिण आफ्रिकेची साथ मिळणं गरजेचं असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पुढील दोन्ही सामने जिंकले तर ३ सामने जिंकून हा संघ ६ गुणांसह अव्वल स्थानी असेल. असं झाल्यास भारतीय संघ ४ गुणांसह सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो. तर वेस्ट इंडिजचा संघ २ गुणांवर राहील.

दुसरं समीकरण

जर दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडिजकडून पराभूत झाला आणि झिम्बाब्वेचा पराभव केला, तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारतीय संघ ४-४ गुणांवर राहतील. असं झाल्यास भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नेट रन रेट चांगला असणं गरजेचं असणार आहे. भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे, सुपर ८ फेरीत भारतीय संघ आपला शेवटचा सामना खेळणार आहे. त्यामुळे नेट रन रेट वाढवण्यासाठी भारतीय संघाला काय करावं लागेल, हे चित्र स्पष्ट असेल.

तिसरं समीकरण

जर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला, तर दक्षिण आफ्रिकेला २ गुणांवर समाधान मानावं लागेल. असं झाल्यास भारतीय संघाकडे सेमी फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी असेल. भारतीय संघ आपले पुढील दोन्ही सामने जिंकून ४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. असं झाल्यास वेस्ट इंडिज आणि भारताचा संघ ४ गुणांसह सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो. तर झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेला २ गुणांवर समाधान मानावं लागेल.