भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. सलामीवीर जॅक क्रॉली वगळता इतर एकाही फलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही. इशांत शर्माने आपल्या गोलंदाजीची धार दाखवत सामन्यातील पहिला बळी मिळवला पण त्यानंतर फिरकीपटूंनी सामन्याची सूत्रे हाती घेतली. अश्विनने इंग्लंडच्या एका फलंदाजाचा उडवलेला त्रिफळा खूपच चर्चेत राहिली.

इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर डॉम सिबली शून्यावर बाद झाला. पाठोपाठ जॉनी बेअरस्टोही शून्यावर माघारी परतला. इंग्लंडला सुरूवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर सलामीवीर जॅक क्रॉलीने डाव सावरला. त्याने शानदार अर्धशतक केलं. कर्णधार जो रूट त्याला साथ देत असतानाच १७ धावांवर अश्विनने त्याची शिकार केली. त्यानंतर जॅक क्रॉलीही अर्धशतक (५३) ठोकून माघारी परतला. पाठोपाठ बेन स्टोक्स (६) आणि ओली पोप (१) स्वस्तात बाद झाले. ओली पोपची विकेट विशेष भाव खाऊन गेली. अश्विनच्या फिरकीपुढे ओली पोप गोंधळून गेला. त्यातच अश्विनने एक सरळ चेंडू टाकला. तो त्याला समजलाच नाही. त्यामुळे त्याने बॅट वेगळ्याच दिशेला नेली आणि तो त्रिफळाचीत झाला.

जोफ्रा आर्चरने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. पण दोन चौकार लगावल्यानंतर तो ११ धावा काढून बाद झाला. नंतर जॅक लीचदेखील अवघ्या तीन धावांवर माघारी परतला. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची नांगी टाकली.