Team India T20 Captaincy: भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना २०२६ टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. संपूर्ण संघाने दमदार कामगिरी केली, सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून उत्तम निर्णय घेतले. पण फलंदाजीत तो स्वतःला सिद्ध करू शकला नव्हता. एकही सामन्यात तो मोठी खेळी करू शकला नव्हता. त्यानंतर आता आयपीएल २०२६ स्पर्धेतही त्याची बॅट शांतच आहे. मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव मधल्या फळीत येऊन मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर आता प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान जर सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून काढलं, तर त्याची जागा कोण घेणार?
सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून चांगले निर्णय घेतले आहेत. पण फलंदाजीत तो सातत्याने फ्लॉप ठरत आहे. त्यामुळे त्याचं संघातील स्थान धोक्यात आहे. जर तो खराब फॉर्ममुळे आयपीएलमधून बाहेर पडला, तर त्याच्या जागी श्रेयस अय्यर हा कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. यासह इशान किशन आणि शुबमन गिल देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १८ वर्षानंतर पहिली ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रजत पाटीदारने कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली आहे. पण त्याला आतापर्यंत टी -२० संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.
शुबमन गिल सध्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार आहे. टी -२० वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात गिलला संघात स्थान मिळणार अशी चर्चा होती, पण त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं. त्याच्या जागी इशान किशनचा संघात समावेश करण्यात आला होता. आता आयपीएलच्या गेल्या काही हंगागांमध्ये श्रेयस अय्यरने कर्णधार आणि फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे. तसेच श्रेयस अय्यरकडे अनुभव देखील आहे. त्यामुळे कर्णधार बनण्याच्या शर्यतीत श्रेयस अय्यर सर्वात पुढे आहे. आता बीसीसीआय सूर्यकुमार यादवच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रोहित शर्माने टी -२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. सूर्याने २०२६ पर्यंत कर्णधार म्हणून ५२ सामने खेळले आहेत. यापैकी ४० सामने जिंकले आहेत. तर केवळ ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान २ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याची विजयाची सरासरी ही ८० टक्क्यांहून अधिक आहे.
