India vs England, Yashasvi Jaiswal: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करण्याच्या संधी निर्माण करून दिल्या. मात्र, भारतीय खेळाडूंना त्या संधीचं सोनं करता आलं नाही. भारतीय संघाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने या सामन्यात बरेच झेल सोडले. ज्या फलंदाजांचे झेल सोडले, त्या फलंदाजांनी शतकं झळकावली. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठा बदल केला जाणार आहे.
यशस्वी जैस्वालने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना हातचे झेल सोडले. जे भारतीय संघाला चांगले महागात पडले. माध्यमातील वृत्तानुसार,दुसऱ्या कसोटीत यशस्वी स्लिपला क्षेत्ररक्षणासाठी उभं केलं जाणार नाही. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी साई सुदर्शन आणि करूण नायर स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करताना दिसून आले. या दोघांसह कर्णधार शुबमन गिल, केएल राहुल आणि नितीश कुमार रेड्डीही स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करताना दिसून आले. यशस्वी जैस्वाल स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करताना दिसून आलेला नाही. यावरून हे स्पष्ट होत आहे की, इथून पुढे त्याला स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणाला उभं केलं जाणार नाही.
तर दुसरीकडे यशस्वी जैस्वाल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रायन डे डोशेट सोबत मिळून खाली राहणाऱ्या झेलचा (फ्लॅट कॅचिंग सेशन) सराव करताना दिसून आला. यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो आगामी कसोटी सामन्यात शॉर्ट लेग किंवा सिली पाईंटला क्षेत्ररक्षण करू शकतो.
पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतकं झळकावली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऋषभ पंत आणि केएल राहुल या दोघांनी शतकं झळकावली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करण्याच्या संधी निर्माण केल्या होत्या. मात्र, यशस्वी जैस्वालने सोडलेले झेल भारतीय संघाला महागात पडले. जर हे झेल सोडले नसते, तर या सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.