Team India Schedule After India vs Srilanka Test Series: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पुनरागमन करुन सामना बरोबरीत संपवला. त्यामुळे ही मालिका भारतीय संघाने १-० ने आपल्या नावावर केली. आता भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला आहे. दरम्यान ही मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघ पु्न्हा मैदानात केव्हा उतरणार? जाणून घ्या.

कसोटी क्रिकेटचा थरार संपल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ आता टी-२० मालिकेत अफगाणिस्तानचा सामना करताना दिसून येणार आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना एकापेक्षा एक थरारक सामने पाहायला मिळू शकतात. अफगाणिस्तानचा संघ देखील तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही मालिका मुळीच सोपी नसणार आहे.

भारत – अफगाणिस्तान टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिला टी-२० सामना- १३ सप्टेंबर (अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम, दिल्ली)
दुसरा टी-२० सामना- १५ सप्टेंबर (अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम, दिल्ली)
तिसरा टी-२० सामना- १७ सप्टेंबर (अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम, दिल्ली)

भारत- अफगाणिस्तान टी-२० मालिका झाल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करताना दिसून येणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना २७ सप्टेंबरला तिरवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये खेळवला जाईल. तर दुसरा सामना ३० सप्टेंबरला गुवाहाटीतील भूपेन हजारीका क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाईल. तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना ३ ऑक्टोबरला न्यू चंडीगडच्या पीसीए स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना २८ सप्टेंबरला खेळणार आहे. त्यानंतर १ ऑक्टोबरला सेमीफायनलचा थरार रंगणार आहे.