Team India Tour Of Ireland: येत्या २८ मार्चपासून आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नुकताच झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताने जेतेपदाचा मान मिळवला आहे. पुढील २ महिने सर्व खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त असणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ आयर्लंडचा दौरा करणार आहे. दोन्ही संघ २ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ५ जूनपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका २० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. ही मालिका झाल्यानंतर काही खेळाडू आयर्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तर काही खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेदरम्यान भारत – आयर्लंड मालिका खेळवली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत नमन अवॉर्ड कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना याबाबत माहिती दिली असावी. भारतीय संघ पुन्हा एकदा टी -२० वर्ल्ड चॅम्पियन आहे. वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर पहिल्याच मालिकेत आयर्लंडचा सामना करणार आहे. याआधी हे दोन्ही संघ ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी आमनेसामने येत होते. पण वेळ कमी असल्याने यावेळी ही मालिका केवळ २ सामन्यांची आयोजित करण्यात आली आहे.

या दौऱ्याची घोषणा आयर्लंड क्रिकेट बोर्डकडून करण्यात आली आहे. बीसीसीआयकडून लवकरच याबाबत अपडेट दिली जाऊ शकते. क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयपीएल झाल्यानंतर पुढील १२ महिने भारतीय संघाचं वेळापत्रक व्यस्त आहे. भारतीय संघ येत्या २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे बहुतांश मालिका या वनडे फॉरमॅटमध्ये खेळवल्या जातील.