Team India World Record: टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारताचा पहिला सामना अमेरिकेविरूद्ध खेळवला गेला. मुंबईच्या वानखेडेवर झालेल्या सामन्यात २९ धावांनी विजय मिळवत संघाने विजयाने सुरूवात केली आहे. या सामन्यात टीम इंडियाने केवळ विजय मिळवला नाही तर एक ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावे केला आहे. भारतीय संघाने असा पराक्रम केला, जो टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात इतर कोणत्याही संघाने आजवर केलेला नाही.
टी-२० फॉरमॅटमध्ये २०२४ पासून भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात एकही सामना न गमावता स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. या स्पर्धेत टीम इंडियाने सलग ८ सामने जिंकले होते. आता, स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेला हरवून, भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सलग नववा विजय मिळवला.
प्रभावी कामगिरीसह, भारताने टी-२० विश्वचषक इतिहासात सर्वाधिक सलग विजयांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. या विजयापूर्वी, भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह पहिल्या संयुक्त स्थानावर होते, ज्यांनी प्रत्येकी सलग आठ विजय मिळवले होते. पण आता टीम इंडियाने त्या सर्वांना मागे टाकलं आहे. यासह टीम इंडिया टी-२० विश्वचषकात सलग ९ सामने जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे.
टी२० विश्वचषकात सर्वाधिक सलग विजय
९ भारत (२०२४-२६) *
८ दक्षिण आफ्रिका (२०२४)
८ ऑस्ट्रेलिया (२०२२-२४)
७ भारत (२०१२-१४)
भारतीय संघासाठी हा विजय सोपा नव्हता. त्यांच्या सामन्याची सुरुवात फारच निराशाजनक झाली. ७७ धावांत सहा विकेट गमावल्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ८४ धावा करून संघाला १६१ धावांपर्यंत पोहोचवलं. सूर्यकुमार यादव वगळता, इतर कोणताही भारतीय फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही, जो स्पर्धेच्या सुरुवातीला संघासाठी मोठा धक्का ठरला. भारताचा फलंदाजी क्रम या स्पर्धेत सर्वात मजबूत मानला जातो, परंतु अमेरिकेसारख्या संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांना धक्का बसला. पण सूर्यकुमारनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संघाला सामना जिंकून दिला.
टीम इंडियाच्या गटात अमेरिका, पाकिस्तान, नामिबिया आणि नेदरलँड्स यांचा समावेश आहे. भारतीय संघ आपला पुढचा सामना नामिबियाविरुद्ध खेळेल. हा सामना गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर भारतीय संघ १५ फेब्रुवारीला पाकिस्तानचा सामना करण्यासाठी कोलंबोला जाईल. पाकिस्तानविरूद्धचा सामना होणार आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर नेदरलँड्सशी भिडणार आहे.
