विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या आणि परदेश दौऱ्यावर सर्वोत्तम कामगिरी करतो आहे. भारतीय संघाच्या या कामगिरीची दखल घेत, BCCI च्या क्रिकेट प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या परदेश दौऱ्यावरील भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे.

मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, परदेश दौऱ्यावर असताना भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आता दरदिवशी २५० अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. (रुपयांमध्ये अंदाजे १७ हजार ७९९) याआधी भारतीय खेळाडूंना दरदिवसाला १२५ अमेरिकन डॉलर भत्त्याच्या स्वरुपात मिळायचे. (रुपयांमध्ये अंदाजे ८ हजार ८९९) भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यात विमानाने बिझनेस क्लासचा प्रवास, हॉटेलमधलं राहणं आणि लाँड्री याचा खर्च बीसीसीआय करतं. याव्यतिरीक्त खेळाडूंना २५० अमेरिकन डॉलर भत्त्याच्या स्वरुपात मिळणार आहेत.

विश्वचषकात पराभवाचा फटका बसल्यानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात दमदार पुनरागमन केलं. टी-२०, वन-डे आणि कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवत भारताने मालिका खिशात घातली. यानंतर भारत थेट २०२० साली जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी भारताचा सर्व सामने आपल्या घरच्या मैदानावर खेळायचे आहेत.