Suryakumar Yadav Injury During Practice : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. आता या फेरीतील संघाचा पहिला सामना २० जून रोजी बार्बाडोस येथे अफगाणिस्तानशी होणार आहे. पण याआधीच भारतीय संघाचा आयसीसी वर्ल्ड टी-२० रँकिंगचा नंबर १ फलंदाज सूर्यकुमार यादवला नेट प्रॅक्टिस दरम्यान दुखापत झाली आहे. थ्रोडाऊनचा सामना करत असताना चेंडू त्याच्या हाताला लागला. यानंतर लगेचच फिजिओ आला आणि सूर्याची काळजी घेतली.

पेनकिलर स्प्रेनंतर सूर्याने पुन्हा सांभाळला मोर्चा –

यादरम्यान सूर्याला खूप वेदना होत असल्याचे दिसले. फिजिओने सूर्याला तत्काळ उपचार केले. मात्र, यादरम्यान एक चांगली गोष्ट म्हणजे सूर्याची दुखापत फारशी गंभीर नव्हती. पेनकिलर स्प्रे मारल्यानंतर सूर्याने पुन्हा मोर्चा सांभाळत फलंदाजी केली. जेव्हा सूर्याला दुखापत झाली तेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खूप टेन्शनमध्ये आल्याचे दिसले. ते काही काळ सूर्याजवळ उभा असलेले पण दिसले. यादरम्यान द्रविडने सूर्या आणि फिजिओ दोघांशीही चर्चा केली. भारतीय संघाने १७ जून रोजी सराव सत्र आयोजित केले होते. ज्यामध्ये सर्व खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

सूर्याने अमेरिकेविरुद्ध झळकावले होते अर्धशतक –

यादरम्यान खेळाडूंनी केवळ थ्रोडाउनचाच सामना केला नाही, तर मुख्य गोलंदाजांचाही सामना केला. राहुल द्रविड आणि उर्वरित कोचिंग स्टाफनेही खेळाडूंना थ्रोडाउन करून सराव करायला लावला. वास्तविक, आगामी सामन्यांमध्ये सूर्या भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात त्याने कठीण परिस्थितीत नाबाद अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर भारतीय संघाने सुपर ८ मध्ये स्थान मिळवले. मात्र, याआधीच्या आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये सूर्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती.

हेही वाचा – WI vs AFG : टी-२० विश्वचषकात निकोलस पूरनचा कहर, एकाच षटकात कुटल्या तब्बल इतक्या धावा, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान