विश्वचषकातील आव्हान कायम राखण्यासाठी आज मोठ्या फरकाने विजय अनिवार्य

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन पराभव पत्करल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ असंख्य आव्हानांना सामोरे जात आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरी गाठायची असल्यास भारताला सर्वप्रथम बुधवारी अफगाणिस्तानची खिंड जिंकावी लागेल.

अबू धाबी येथे अव्वल-१२ फेरीतील लढतीत उभय संघ आमनेसामने येणार असून या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. भारताच्या संघनिवडीकडेही सर्वांचे लक्ष राहणार असून अफगाणिस्तानने यापूर्वी आपल्याला अनेकदा कडवी झुंज दिली असल्याने चाहत्यांना रंगतदार सामना पाहायला मिळेल.

दुसऱ्या गटात समावेश असलेल्या भारताला सलामीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने सहज धूळ चारली. त्यामुळे भारत सध्या गुणतालिकेत शून्य गुणासह पाचव्या स्थानी आहे. मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने मात्र स्कॉटलंड, नामिबिया यांना धूळ चारून तूर्तास गटात दुसरे स्थान पटकावले आहे. अफगाणिस्तानला फक्त पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

रोहित सलामीला; अश्विनला संधी

न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा डाव फसला. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध रोहित इशान किशनच्या साथीने सलामीला येण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवच्या तंदुरुस्तीविषयी अद्याप संभ्रम कायम असल्याने के. एल. राहुल मधल्या फळीत खेळू शकतो. गोलंदाजीत मात्र वरुण चक्रवतीच्या जागी रविचंद्रन अश्विनचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. हार्दिक पंड्याने गेल्या सामन्यात गोलंदाजी केल्यामुळे त्याच्यावर संघ व्यवस्थापन पुन्हा विश्वास दर्शवण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने सर्वांच्या सहमतीने घेतला होता. त्यामुळे आता झाले ते विसरून अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संघात नेमके किती बदल होतील, हे सांगणे कठीण असले, तरी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला खेळवण्याबाबत आम्ही विचार करत आहोत.   – विक्रम राठोड, फलंदाजी प्रशिक्षक

उभय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकात तिसऱ्यांदा आमनेसामने येत असून यापूर्वी २०१० आणि २०१२मध्ये झालेल्या दोन्ही लढतीत भारताने बाजी मारली होती.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, स्टार स्पोटर्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)