Tejaswin Shankar Bronze Medal CWG Decathlon: भारताचा अनुभवी खेळाडू तेजस्विन शंकर याने ग्लासगोमध्ये अशी कामगिरी केली आहे, जी कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला जमली नव्हती. जिथे सर्व खेळाडू एकाच खेळात आपलं नैपुण्य दाखवत पदकाची कमाई करतात, तिथे डेकेथलॉनमध्ये १० वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सातत्याने चांगली कामगिरी करत पदक मिळवलं. काही आठवड्यांपूर्वीपर्यंत ‘हाय जंप’मधील (उंच उडी) राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर असलेल्या तेजस्विनने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘डेकॅथलॉन’ प्रकारात कांस्यपदक जिंकलं आहे.
शुक्रवारी, ३१ जुलै रोजी डेकॅथलॉनमधील अंतिम स्पर्धा म्हणजेच १५०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करून त्याने तिसरे स्थान पटकावलं आणि हे पदक जिंकून इतिहास घडवला. पुरुषांची ‘डेकॅथलॉन’ म्हणजेच दहा क्रीडाप्रकारांची संयुक्त स्पर्धा दोन दिवस चालली आणि त्यात एकूण १० क्रीडाप्रकारांचा समावेश होता.
सुमारे ६ फूट ४ इंच उंची असलेल्या तेजस्विन शंकरने २०२२ पर्यंत पूर्णपणे ‘हाय जंप’ (उंच उडी) या प्रकारावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्याने २०१८ मध्ये २.२९ मीटरचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. सर्वेश कुशारेने अलीकडेच हा विक्रम मोडीत काढण्यापूर्वी, तब्बल आठ वर्षे हा विक्रम तेजस्विनच्या नावावर होता. त्याचा हाय जंपमधील विक्रम आता मागे पडला असला, तरी तेजस्विनच्या नावावर आता ‘डेकॅथलॉन’चा राष्ट्रीय विक्रम आहे; तसेच, त्याने २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात रौप्य पदकही जिंकले होते.
रोलरकॉस्टर राईड असलेली डेकेथलॉन स्पर्धेत कोणकोणते क्रीडा प्रकार असतात?
डेकॅथलॉनचा विजेता हा सर्वसाधारणपणे जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानला जातो. यामागचं कारण म्हणजे या स्पर्धेतील दहा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा. प्रत्येक धाव, उडी किंवा फेकीनंतर गुणतालिकेतील क्रमवारी बदलू शकते. त्यामुळे डेकॅथलॉन ही स्पर्धा एखाद्या रोलर-कोस्टर राईडप्रमाणे अत्यंत रोमांचक मानली जाते, जिथे प्रत्येक प्रकारानंतर पदकांच्या शर्यतीचं चित्र बदलत राहतं. पाहूया कशी होती ही स्पर्धा
१. डेकॅथलॉनच्या पहिल्या प्रकारात म्हणजेच १०० मीटर धावण्यात तेजस्विन शंकरने १०.९६ सेकंदांची वेळ नोंदवली. सुरुवातीला त्याच्या गुडघ्याची दुखापत त्याला त्रास देत असल्याचं जाणवत होतं.
२. दुसऱ्या प्रकारात लांब उडीत त्याने जबरदस्त पुनरागमन करत आपण पदकाच्या शर्यतीतून बाहेर जाणार नसल्याचं दाखवून दिलं. लांब उडीत तेजस्विनने ७.८२ मीटरची उडी मारत वैयक्तिक सर्वोत्तम (PB) कामगिरीची नोंद केली. यापूर्वी त्याची सर्वोत्तम उडी ७.६७ मीटर होती. या कामगिरीसाठी त्याला १०१५ गुण मिळाले आणि तो एकूण गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला.
३. गोळाफेक (शॉट पुट) प्रकारात त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तीन प्रयत्नांमध्ये त्याची सर्वोत्तम फेक १३.०९ मीटर इतकी राहिली. या कामगिरीसाठी त्याला ६७३ गुण मिळाले आणि तीन प्रकारांनंतर २५५८ गुणांसह तो एकूण गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरला.
४. तेजस्विनचं बलस्थान असलेली उंच उडी (हाय जंप) प्रकार आला. वैयक्तिक सर्वोत्तम २.२९ मीटरची नोंद असलेल्या तेजस्विनकडून मोठ्या गुणांची अपेक्षा होती. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो २.१५ मीटरपर्यंतच मजल मारू शकला. तरीही या प्रकारात त्याने ९४४ गुण मिळवले. चार प्रकारांनंतर ३५०२ गुणांसह तो पुन्हा दुसऱ्या स्थानावर पोहोचला.
५. पहिल्या दिवसातील अखेरच्या ४०० मीटर शर्यतीत तेजस्विन आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम ४८.२९ सेकंदांपासून दूर राहिला. मात्र, ४९.५१ सेकंदांची वेळ नोंदवत त्याने ४३३९ गुणांसह पहिला दिवस दुसऱ्या स्थानावर संपवला.
६. दुसऱ्या दिवसाची सुरुवात तेजस्विनने ११० मीटर अडथळा शर्यतीत १४.४१ सेकंदांची वेळ नोंदवत केली. या कामगिरीनंतर तो ५२६१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम राहिला.
७. डिस्कस थ्रोमध्ये त्याने प्रथम ३९.६६ मीटरची फेक करत स्वतःचाच विक्रम मोडला आणि शेवटच्या प्रयत्नात ४०.४४ मीटरची फेक करत आणखी सुधारणा केली. या प्रकारात त्याला ६७४ गुण मिळाले आणि ५९३५ गुणांसह त्याने एकूण गुणतालिकेतील दुसरं स्थान कायम राखलं.
८. तेजस्विनसाठी सर्वात कमकुवत प्रकार मानला जाणारा पोल व्हॉल्ट झाला. त्याने सहजपणे ४.३० मीटर उंची पार करत ७०२ गुण मिळवले. मात्र, इतर प्रतिस्पर्ध्यांनी अधिक उंची गाठल्याने त्यांनी गुणतालिकेत आघाडी घेतली. आठ प्रकारांनंतर तेजस्विन ६६३७ गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला.
९. भालाफेक प्रकारात व्हिक्टरने ६३.०६ मीटरच्या दमदार फेकीसह सुवर्णपदक जवळपास निश्चित केलं. दुसरीकडे तेजस्विनने हंगामातील सर्वोत्तम ५३.१२ मीटरची फेक नोंदवत पुन्हा पदकाच्या शर्यतीत पुनरागमन केलं. या कामगिरीनंतर त्याच्या खात्यात ७२७२ गुण जमा झाले आणि तो पुन्हा पदकाच्या स्थानावर पोहोचला. दरम्यान, सॅमी बॉल तेजस्विनपेक्षा १०९ गुणांनी मागे असल्याने त्याला १५०० मीटर धावण्यात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची गरज होती, तर तेजस्विनला केवळ आपली आघाडी कायम राखायची होती.
१०. तेजस्विनने अखेरच्या १५०० मीटर धाव प्रकारात ७०४ गुण मिळवत पदक निश्चित केलं आणि कॉमनवेल्थ गेम्समधील डेकॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं यश मिळवून दिलं. यासोबतच तो कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात अॅथलेटिक्समधील दोन वेगवेगळ्या प्रकारांत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
