शेवटच्या मिनिटापर्यंत चुरशीने झालेल्या लढतीत पुणेरी पलटण संघाने तेलुगू टायटन्सविरुद्ध घरच्या मैदानात विजयाची संधी गमावली. तेलुगू संघाने ४२-३६ असा विजय मिळवीत प्रो कबड्डी स्पर्धेत दुसरा विजय मिळविला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या लढतीत तेलुगू संघाने पूर्वार्धात १९-१८ अशी आघाडी घेतली होती. तेलुगू संघाकडून राहुल चौधरी याने १२ गुण कमावले, तर सुकेश हेगडेने ९ गुण मिळविले. राहुलने शेवटची तीन मिनिटे बाकी असताना वझिरसिंग याची केलेली पकड निर्णायक ठरली. तेलगु संघाच्या सुकेश हेगडेने सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला, तर त्याचा सहकारी गोपूला उत्कृष्ट बचावरक्षकाचे बक्षीस मिळाले. पुण्याच्या प्रवीण नेवाळे याने पकडीचे बक्षीस पटकाविले. या पराभवामुळे पुण्याच्या अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या आशा संपुष्टात आल्या.
आतापर्यंत पहिल्या सहा सामन्यांत केवळ एकच विजय मिळविणारा पुण्याचा संघ येथे विजय मिळविणार की नाही हीच उत्कंठा होती. पहिल्या चार मिनिटांत ०-४ अशा पिछाडीवरून १० व्या मिनिटाला ७-७ अशी बरोबरी साधली. प्रवीण नेवाळे याने लागोपाठ दोन चढायांमध्ये प्रत्येकी तीन गडी बाद करीत तेलुगू संघावर लोण चढविला. मात्र नंतर पकडीमधील चुकांमुळे मध्यंतरापूर्वी पुण्याने लोण स्वीकारला. पूर्वार्धात तेलुगू संघ १९-१८ असा आघाडीवर होता. उत्तरार्धात पुण्याने लगेचच बरोबरी केली, पाठोपाठ उत्कृष्ट पकडी व खोलवर चढाया असा खेळ करीत पुण्याने आघाडी घेतली होती. मात्र ३६ व्या मिनिटाला ३६-३६ अशी बरोबरी झाल्यामुळे खेळातील रंगत वाढली. तीन मिनिटे बाकी असताना प्रवीण व कर्णधार वझिरसिंग हे दोन्ही चढाईपटू बाद झाल्यामुळे पुण्याची बाजू कमकुवत झाली. शेवटचे मिनीट बाकी असताना पुण्याने लोण स्वीकारला व पाठोपाठ सामनाही ३६-४२ असा गमावला.

उपांत्य आणि अंतिम सामना मुंबईत
मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने मुंबईला होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या एनएससीआयमध्ये उपान्त्य फेरीचे सामने २९ ऑगस्टला होणार आहेत, तर अंतिम फेरीचा थरार ३१ ऑगस्टला अनुभवता येणार आहे. यापूर्वी हे सामने बंगळुरूला खेळवण्याचा आयोजकांचा मानस होता. पण मुंबईमधील प्रतिसाद पाहता हा निर्णय बदलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.