शेवटपर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत तेलगू टायटन्स संघाने अग्रस्थानावर असलेल्या यू मुंबा संघावर ४४-४३ असा रोमहर्षक विजय नोंदवत प्रो-कबड्डी लीगमध्ये आव्हान कायम राखले. अन्य लढतीत पाटणा पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सला ५२-३० असे सहज हरवले.
तेलगू संघाने मुंबाविरुद्ध पूर्वार्धात २२-१५ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्या विजयात राहुल चौधरी याने २२ गुण नोंदवत सिंहाचा वाटा उचलला. यू मुंबा संघाच्या पवन कुमार व अनुप कुमार यांनी प्रत्येकी १३ गुण मिळविले.
पाटणा संघाने सुरेख सांघिक खेळ करीत जयपूरविरुद्ध वर्चस्व गाजवले. त्यांनी पूर्वार्धात २५-१२ अशी आघाडी मिळविली होती. संदीप नरवाल (९) व राकेशकुमार (८) यांनी पाटणाकडून उल्लेखनीय कामगिरी केली. जयपूरच्या जसवीर व मनिंदर सिंग यांनी प्रत्येकी सात गुण मिळवत चांगली लढत दिली.