प्रो कबड्डी लीग

प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी हरयाणा स्टीलर्स व तमिळ थलायव्हा यांच्यात झालेला पहिला सामना ४०-४० असा बरोबरीत सुटला. तर दुसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सचा ३९-३४ असा पराभव करून त्यांच्या बाद फेरीच्या आशा धुळीस मिळवल्या.

कोलकाता येथील नेताजी इन्डोर स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हरयाणाने अखेरच्या मिनिटात दोन गुण मिळवून पराभव टाळला. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक बोली लागलेल्या हरयाणाच्या मोनू गोयतने चढायांचे १७ गुण मिळवले. त्याला तमिळ थलायव्हाच्या अजय ठाकूरनेदेखील चढायांचे १७ गुण मिळवून कडवी झुंज दिली. या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले असून हरयाणाने ‘अ’ गटात, तर थलायव्हाने ‘ब’ गटात अखेरचे स्थान मिळवले.

हरयाणासाठी प्रतिभावान विकास खंडोलानेदेखील १० गुण मिळवत मोनूला योग्य साथ दिली. थलायव्हासाठी आनंदने चढायांचे ८, तर अमित हुडाने पकडींचे चार गुण मिळवत मोलाची कामगिरी केली.

दुसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सवर ३९-३४ अशी मात करून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. बंगालसाठी मनिंदर सिंगने चढायांचे सर्वाधिक १२ गुण मिळवले, त्याला सुरजीत सिंगकडून बचावात चांगली साथ लाभली. राहुल चौधरीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या तेलुगूसाठी अरमानने चढायांचे ११ गुण मिळवले.

तेलुगूच्या पराभवामुळे पाटणा पायरेट्स आणि यूपी योद्धा या संघांची बाद फेरी गाठण्याची संधी अधिक बळावली असून दोन्ही संघांचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे.