घरच्या मैदानावर विजयपथावर परतलेल्या तेलुगू टायटन्स संघाने प्रो-कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटणचा ६०-२४ असा धुव्वा उडवला. अन्य लढतीत बंगाल वॉरियर्सने पाटणा पायरेट्सवर ३०-२८ असा निसटता विजय मिळवत सूर गवसल्याचे संकेत दिले. तेलुगू टायटन्सतर्फे दीपक निवास हुडाने चढायांच्या सर्वाधिक १६ गुणांची कमाई केली. राहुल चौधरीने ८ गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली. टायटन्सच्या झंझावातासमोर पुण्याचा संघ निष्प्रभ ठरला. या विजयामुळे टायटन्सच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, दुसरीकडे पुण्याचा संघ गुणतालिकेत तळाच्याच स्थानी आहे.
पाटण्याचे आक्रमण आणि बंगालचा बचाव यांच्यातील मुकाबल्यात बंगालनेच सरशी साधली. वॉरियर्सच्या महेंद्र राजपूतला बाद करण्याच्या प्रयत्नात पायरेट्सचा कर्णधार राकेश कुमारच्या पायाला दुखापत झाली. राकेशच्या अनुपस्थितीमुळे पायरेट्सचे आव्हान कमकुवत झाले, मात्र तरीही मध्यंतराला पाटण्याचा संघ १४-११ असा आघाडीवर होता.
विश्रांतीनंतर बंगालच्या संघाने जोरदार आक्रमण केले. वॉरियर्सच्या महेश गौडने चढायांचे ८ गुण मिळवत पायरेट्सला अडचणीत टाकले. नितीन मदानेने ५ गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली.