Temba Bavuma Statement After Historic Win: लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. गेल्या २७ वर्षांत जे कोणालाच जमलं नव्हतं ते तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने करून दाखवलं आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिवावर ५ गडी राखून विजय मिळवला. तेंबा बावूमा हा दक्षिण आफ्रिकेला आयसीसीची ट्रॉफी जिंकून देणारा दुसराच कर्णधार ठरला आहे. या विजयानंतर काय म्हणाला तेंबा बावूमा? जाणून घ्या.
ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. दोन्ही संघांमध्ये तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी बहुमूल्य योगदान दिलं. मात्र, कर्णधार तेंबा बावूमा, एडेन मारक्रम आणि गोलंदाजीत कगिसो रबाडा यांनी केलेली कामगिरी विशेष ठरली.
विजयानंतर तेंबा बावूमा काय म्हणाला?
हा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी अतिशय खास आहे. या विजयानंतर बोलताना तेंबा बावूमा म्हणाला, ” गेले काही दिवस आमच्यासाठी खूप खास होते. काही क्षणासाठी आम्हाला वाटलं होतं की, आम्ही दक्षिण आफ्रिकेतच आहोत. आम्ही खूप मेहनत घेतली आणि खूप विश्वासाने इथे आलो होतो. आम्ही आमच्यावर शंका घेण्याऱ्यांचाही सामना केला. पण, आम्ही उत्तम खेळ केला याचा आम्हाला आनंद आहे. हा क्षण आमच्यासाठी आणि आमच्या देशवासियांसाठी अतिशय खास आहे.”
यासह तेंबा बावूमाने संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचंही कौतुक केलं. त्याचं कौतुक करताना तेंबा बावूमा म्हणाला, ” कगिसो रबाडा आमच्या संघातील अतिशय महत्वाचा खेळाडू आहे. काही दिवसांपूर्वी मी हॉल ऑफ फेमच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मला विश्वास आहे, काही वर्षांनंतर रबाडाचेही नाव त्यात असेल.”
दक्षिण आफ्रिकेचा दमदार विजय
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मारक्रमने सर्वाधिक १३६ धावांची खेळी केली. त्याला साथ देत कर्णधार तेंबा बावूमाने ६६ धावांची खेळी केली.या दोघांनी फलंदाजीत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. गोलंदाजीत कगिसो रबाडाने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ४ गडी बाद केले. त्याने दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले. त्याला साथ देत लुंगी एन्गिडीने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या ३ प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.