आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाची कारवाई

उत्तेजक सेवन करणाऱ्या खेळाडूंना पाठिशी घातल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) अखिल रशिया अ‍ॅथलेटिक्स महासंघावर तात्पुरती बंदी घातली आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला जेमतेम नऊ महिने बाकी असताना अ‍ॅथलेटिक्स सत्ताकेंद्र असलेल्या रशियाच्या संघटनेवरील खळबळजनक मानली जात आहे. आयएएएफचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी बंदीची घोषणा करताना सांगितले, आम्हाला हा नाईलाजास्तव कटू निर्णय घ्यावा लागला आहे. केवळ रशियाच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये उत्तेजकाबाबत फारसे गांभीर्याने घेतले जात नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र अन्य खेळाडूंना बोध मिळावा यासाठी आम्ही ही कारवाई केली आहे. कोणत्याही स्तरावर फसवणूक मान्य केली जाणार नाही हा संदेश आम्ही सर्व खेळाडू व संघटकांना दिला आहे.
आयएएएफच्या कार्यकारिणीची बैठक को यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीस कार्यकारिणीच्या २७ सदस्यांपैकी २४ सदस्य उपस्थित होते. त्यांच्यासमोर सदस्य व ऑल रशिया अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सरचिटणीस मिखाईल बुटोव यांनी आपली बाजू मांडली. बंदीचा निर्णय घेण्यासाठी मतदान घेण्यात आले. बंदी घालण्याच्या निर्णयास २२ सदस्यांनी मान्यता दिली.
जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) दिलेल्या अहवालानुसार उत्तेजक सेवन करणाऱ्या खेळाडूंना रशिया पाठिशी घालत असल्याचा आरोप ठेवण्यात आला. ‘वाडा’ संस्थेचे माजी अध्यक्ष दिक पाउंड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने रशियन खेळाडूंना आगामी ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास मनाई करावी म्हणजे त्यांच्या खेळाडूंबरोबरच अन्य खेळाडूंनाही योग्य संदेश दिला जाईल अशी शिफारस केली होती.
आयएएएफने दिलेल्या पत्रकानुसार रशियन खेळाडूंना जागतिक अ‍ॅथलेटिक्स मालिका तसेच ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येणार नाही. जागतिक चालण्याची स्पर्धा व जागतिक कुमार मैदानी स्पर्धा या दोन्ही स्पर्धाचे आयोजनही रशियात २०१६ मध्ये केले जाणार होते. या स्पर्धाचे यजमानपदही रशियास गमवावे लागणार आहे.
रशियास आयएएएफचे पुन्हा सदस्यत्व मिळविण्यासाठी आता खूप सोपस्कार पूर्ण करावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक तज्ज्ञ रुनी अँडरसन यांच्या नेतृत्वाखालील एक समिती नियुक्त केली जाणार आहे. ही समिती येत्या काही दिवसांमध्ये रशियास भेट देऊन तेथील उत्तेजक प्रतिबंधक सुविधांची तपासणी करणार आहे. उत्तेजक सेवन करणाऱ्या खेळाडूंना पाठिशी घालण्यासाठी रशियात मोठय़ा प्रमाणावर लाच घेतली जात असल्याचा आरोपही ‘वाडा’ च्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. तसेच आयएएएफचे माजी अध्यक्ष लॅमिनी दियाक यांचाही त्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून ‘वाडा’ संस्थेला सर्व सहकार्य करण्याचीही तयारी दर्शविली आहे. रशियातील क्रीडाक्षेत्र स्वच्छ करण्याबाबत शासकीय स्तरावर कठोर पावले उचलली जातील असेही पुतीन यांनी सांगितले.