राजधानी दिल्लीत विमानतळापासून दिल्ली नगर निगम बसचे थांबे आणि मुख्य चौक ते मेट्रो स्थानकांपर्यंत इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगच्या जाहिराती झळकत होत्या. गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांत आंतरराष्ट्रीय टेनिस नभांगणावरचे अव्वल खेळाडू तुम्हाला ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवायचे असतील तर इंदिरा गांधी स्टेडियमकडे कूच करा, असा या जाहिरातींचा आशय होता. रॉजर फेडररपासून स्टॅनिसलॉस वॉवरिन्कापर्यंत आणि सेरेना विल्यम्सपासून मारिया शारापोव्हापर्यंत असा या लीगचा पट आहे. मात्र प्रत्यक्षात दिल्लीत आटोपलेल्या पर्वाला अव्वल खेळाडूंनी ठेंगा केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
फ्रँचायझी पद्धतीच्या लीगमध्ये खेळाडू करारबद्ध झाल्यानंतर दुखापतीचा अपवाद वगळता त्याला लीगच्या सर्व सामन्यांमध्ये खेळणे अनिवार्य असते. मोठय़ा खेळाडूंचे सामने संयोजकांना आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर ठरतात. आयपीटीएल स्पर्धा मात्र त्याला अपवाद आहे. कोणताही टेनिसपटू कोणत्याही टप्प्यात खेळतो, हवे तेव्हा माघार घेतो. संकेतस्थळावर संघांची माहिती आणि सामन्याआधी संयोजकांनी पुरवलेली संघ सूची यात प्रत्येक वेळी तफावत आढळते. कोणतीही सूचना न देता अचानक कोणताही खेळाडू थेट संघात सामील होऊन ‘डगआऊट’मध्ये बसल्याचे दिसते. यंदाच्या हंगामात यूएई रॉयल्सच्या रॉजर फेडररच्या भारतीय चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. त्याला पाहण्यासाठी असंख्य फेडररप्रेमी गुरुवारी स्टेडियमवर दाखल झाले होते. सामना सुरू झाल्यानंतर फेडरर खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले व हजारो रुपये मोजून आलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. अखेर शनिवारी त्याचे दर्शन घडले. झुंजार खेळासाठी प्रसिद्ध राफेल नदाल गुरुवारी खेळला. शुक्रवारी त्याला पुन्हा पाहण्यासाठी आतुर मंडळींना तो दिसलाच नाही, कारण दिवसभर प्रायोजकांच्या भरगच्च कार्यक्रमात व्यग्र नदालने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. नदालला पाठिंबा देणारे फलक घेऊन आलेल्या चाहत्यांना निराश व्हावे लागले.
यंदाच्या वर्षांत जेतेपदे पटकावण्यात अद्भुत सातत्य जपणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने यंदा लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी जोकोव्हिचला दिल्लीकरांचा जोरदार पाठिंबा मिळाला होता. नदाल-फेडरर-जोकोव्हिच त्रिकुटाची ग्रँड स्लॅम जेतेपदांवरची सद्दी मोडणाऱ्या अँडी मरे आणि स्टॅनिसलॉस वॉवरिन्का यांनीही दिल्ली टप्प्यात न खेळणेच पसंत केले. विशेष म्हणजे काही दिवसांतच चेन्नईत होणाऱ्या चेन्नई खुल्या स्पर्धेत वॉवरिन्काला अग्रमानांकन देण्यात आले आहे. जेतेपद कायम राखण्यासाठी वॉवरिन्का खेळणार आहे, मात्र आयपीटीएलचा दिल्ली टप्पा वॉवरिन्काला फारसा भावलेला नाही. इंडियन आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडाचा झेंडा अभिमानाने फडकवणारा जपानचा केई निशिकोरी तसेच कॅनडाचा मिलोस राओनिक दिल्ली टप्प्यात फिरकलेले नाहीत. मनिला व कोबे येथे झालेल्या सामन्यांमध्ये सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय महिला टेनिसमधील या दमदार खेळाडूंनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दिल्लीला बगल दिली आहे.
‘‘फेडरर-नदाल-जोकोव्हिचसारख्या मोठय़ा खेळाडूंवर लीगचे सर्व टप्पे, सामने खेळा अशी सक्ती करता येत नाही. आपापल्या वेळापत्रकानुसार ते सहभागी होतात,’’ अशी भूमिका एरव्ही कट्टर व्यावसायिकतेसाठी प्रसिद्ध लीगचा संस्थापक महेश भूपतीने घेतली.