संसदेच्या अधिवेशनामुळे जाणवणारी राजकीय गर्दी आणि प्रदूषणाच्या काजळीने झाकोळलेले वातावरण हे रंग बदलण्यासाठी राजधानी दिल्लीत इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगच्या निमित्ताने गुरुवारपासून टेनिसची मैफल रंगणार आहे. हार-जीतपेक्षाही आंतरराष्ट्रीय टेनिसमधील दिग्गजांना प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी दर्दी टेनिस चाहते सज्ज झाले आहेत. रॉजर फेडरर, राफेल नदाल या सार्वकालीन महान खेळाडूंना समोरासमोर खेळताना पाहताना चाहत्यांना ग्रँड स्लॅम द्वंद्वाची झलक पाहता येणार आहे. ३४व्या वर्षीही जिंकण्यातले सातत्य जपणारी सेरेना विल्यम्स व सौंदर्यवती मारिया शारापोव्हा या दोघीही दिल्लीत खेळणार नसल्याचे चाहत्यांचा हिरमोड होण्याची चिन्हे आहेत. तसेच अँडी मरे, स्टॅनिसलॉस वॉवरिन्का यांच्या सहभागाविषयी साशंकता असल्याने फेडरर-नदाल यांच्याभोवतीच चर्चेचा पिंगा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सानिया मिर्झा, लिएण्डर पेस व रोहन बोपण्णा या भारतीय त्रिकुटाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. जेतेपद कायम राखण्यासाठी इंडियन एसेसचा संघ आतूर आहे. पाच हजारांपासून तब्बल ४८ हजारांपर्यंत तिकिटांचे दर जाऊनही चाहत्यांचा उत्साह जराही कमी झालेला नाही.
इंदिरा गांधी स्टेडियमवर गुरुवारी आपल्या लाडक्या खेळाडूचा जयघोष करण्यासाठी चाहते मंडळी ‘तय्यार’ असल्याचे समाजमाध्यमांवर जाणवते आहे. गुरुवारी लिजंडरी जपान वॉरियर्स व यूएई रॉयल्स यांच्यात सलामीची लढत होणार आहे. वॉरियर्सच्या पेसला चाहत्यांचा अमाप पाठिंबा मिळणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दुहेरीच्या जोडय़ांमध्ये पेस आणि महेश भूपतीचे नाव घेतले जाते. भारतीयांना अभिमानास्पद अशी ही जोडी वैयक्तिक कारणांमुळे विलग झाली व आरोप-प्रत्यारोपांचा सामनाही पाहायला मिळाला. गतवर्षी पेस विजय अमृतराज यांच्या चॅम्पियन्स टेनिस लीगमध्ये सहभागी झाला होता. मागच्या कटू आठवणी बाजूला ठेवून भूपतीने पेसला आयपीटीएलच्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. पेस दिल्ली टप्प्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.
इंडियन एसेसने रॉजर फेडररऐवजी लढवय्या राफेल नदालला संघात स्थान दिले आहे. यंदाच्या हंगामात दुखापतींमुळे जखमी वाघासारखी अवस्था झालेला नदाल तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी आतुर आहे. चिरतरुण रॉजर फेडरर व जपानचा युवा केई निशिकोरी यांच्यातले द्वंद्व अनुभवायला प्रेक्षकांना मिळणार होती. मात्र निशिकोरीे दिल्ली टप्प्यात खेळणार नसल्याने युवा ऊर्जा विरुद्ध दमदार अनुभव हा मुकाबलाही होऊ शकणार नाही.

जपान वॉरियर्स विरुद्ध यूएई रॉयल्स
वेळ : संध्याकाळी ४ वाजता
संघ – जपान वॉरियर्स : लिएण्डर पेस, केई निशिकोरी, मारिया शारापोव्हा, थॉमस एन्क्व्स्टि, फिलीप कोहलश्रायबर, पिआरे ह्य़ूज हरबर्ट, मिरजाना ल्युसिस बारोनी, कुरुमी नारा.
युएई रॉयल्स : रॉजर फेडरर, डॅनियल नेस्टर, अ‍ॅना इव्हानोव्हिक, टॉमस बर्डीच, क्रिस्तिना लाडेनोव्हिक, गोरान इव्हानिसेव्हिक, मारिन चिलीच.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ४ आणि स्टार स्पोर्ट्स ४ एचडी

इंडियन एसेस विरुद्ध फिलीपाइन्स मॅव्हरिक्स
वेळ : संध्याकाळी ७.३० वाजता
संघ – इंडियन एसेस : फॅब्रिस सँटोरो, रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा, राफेल नदाल, समंथा स्टोसूर, गेइल मॉनफिल्स, इव्हान डोडिग
फिलीपाइन्स मॅव्हरिक्स : ट्रेट ह्य़ुे, मिलोस राओनिक, जर्मिला गाजाडोसोव्हा, रिचर्ड गॅस्क्वेट, एडय़ुअर्ड रॉजर व्हॅसेलिन, अजला टॉमलाजेव्हेनिक, मार्क फिलीपायुस, सेरेना विल्यम्स.