‘‘टेनिसमध्ये सामनानिश्चितीसारखा प्रकार रोखण्यासाठी संघटनेने स्वयंप्रेरित होऊन प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई पारदर्शक असायला हवी,’’ असे इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरे याने सांगितले.
‘‘गैरप्रकार होत असतील तर दोषी व्यक्तींची नावे समोर यायला हवीत. खेळाडू या नात्याने खेळात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती मिळायला हवी. यापैकी काही गोष्टींमध्ये तथ्य असेल, काहीत नाही. परंतु अशा माहितीबाबत स्पष्टता यायला हवी. सामनानिश्चितीसारख्या प्रकरणांची माहिती खेळाडूंना प्रसारमाध्यमांकडून समजायला नको. टेनिस संघटनेने खेळाडूंशी चर्चा करावी. असे प्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल या दृष्टीने खेळाडूंना प्रशिक्षण देता येईल’, असे मरेने सांगितले.
यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे प्रायोजकत्व एका बेटिंग कंपनीला मिळण्याची शक्यता होती. त्याविषयी विचारले असता मरे म्हणाला, ‘हा दांभिक प्रकार आहे. बेटिंग करणाऱ्या कंपनीने ग्रँड स्लॅम स्पर्धा प्रायोजित करावी हे अविश्वसनीय आहे. ही प्रक्रिया कशी चालते मला खरंच समजत नाही. हे सगळंच विचित्र आहे’.