ऑनलाइन चित्रफितीनंतरही सुरक्षिततेबाबत प्रश्न कायम

एपी, बीजिंग : बेपत्ता टेनिसपटू पेंग श्वेइने रविवारी बीजिंग येथे एका कनिष्ठ गटाच्या टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ाला उपस्थिती लावल्याची चित्रफीत स्पर्धेच्या आयोजकांनी प्रसिद्ध केली. त्यामुळे चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने पेंग सुरक्षित असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला असला तरी जगभरात तिच्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

पेंगने दोन आठवडय़ांपूर्वी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उप-उच्चाधिकारी (व्हाइस प्रीमियर) झांग गाओली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या सुरक्षिततेबाबत जगभरातून आणि विशेषत: टेनिसविश्वातून प्रश्न उपस्थित केले जात होते.

‘वेबो’ या समाजमाध्यम सेवेवर चीन खुल्या टेनिस स्पर्धेकडून पेंगची चित्रफीत रविवारी प्रसिद्ध करण्यात आली. तीन ऑलिम्पिकमध्ये चीनचे प्रतिनिधित्व करणारी पेंग या कनिष्ठ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ानिमित्त आयोजकांसह टेनिस कोर्टच्या बाजूला उभी होती. तिने स्पर्धेसाठी उपस्थित चाहत्यांना हात दाखवला आणि लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या चेंडूंवर आपली स्वाक्षरी दिल्याचे या चित्रफितीमध्ये दिसत होते.

या चित्रफितीमुळे पेंग पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दाखवण्याचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा डाव असल्याचे म्हटले जात आहे. पेंगचा पत्ता लागेपर्यंत चीनमध्ये महिलांच्या टेनिस स्पर्धा आयोजित करणार नसल्याचे महिला टेनिस संघटनेने सांगितले आहे. तसेच पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद चीनकडून काढून घेण्याचीही मागणी होत आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षावरील दडपण दिवसेंदिवस वाढत आहे.