मुंबईत लवकरच सुसज्ज टेनिस स्टेडियम

एमएसएलटीएची एमएमआरडीएशी बोलणी सुरू

एमएसएलटीएची एमएमआरडीएशी बोलणी सुरू

मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने मुंबईत सुसज्ज टेनिस स्टेडियम उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे (एमएसएलटीए) सचिव सुंदर अय्यर यांनी शुक्रवारी दिली.

‘‘मुंबईतील अनेक क्लब्समध्ये टेनिस कोर्ट आहेत. मात्र खूप प्रमाणात प्रेक्षक बसतील, असे स्टेडियम नाही. मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्यासाठी संबंधित असोसिएशनचे स्वत:चे स्टेडियम असणे, बंधनकारक आहे. मुंबईत सुसज्ज स्टेडियम बांधण्यासाठी असोसिएशन उत्सुक आहे. त्यादृष्टीने मुंबई शहर रस्ते विकास प्राधिकरणाशी (एमएमआरडीए) आमची बोलणी सुरू आहेत. त्यांनी आम्हाला दोन-तीन जागांचे प्रस्ताव दिले आहेत. त्यातील एक जागा आम्हाला निवडायची आहे. सद्य:स्थितीत ती जागा पडीक आहे. तिचा विकास करून आम्हाला त्यावर बांधकाम करावे लागेल. या प्रक्रियेसाठी काही वर्षांचा कालावधी लागेल. मात्र भविष्यात मुंबईत एमएसएलटीएचे टेनिस स्टेडियम असेल,’’ असे अय्यर यांनी सांगितले.

पुढील वर्षी मुंबईमध्ये तीन ते चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार असल्याचे अय्यर यांनी संकेत दिले. ते म्हणाले, ‘‘एमएसएलटीएतर्फे मुंबईमध्ये कनिष्ठ गटाच्या स्पर्धा भरवल्या जातात. याच महिन्यात क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये (सीसीआय) एक लाख २५ हजार डॉलर रकमेचे बक्षीस असलेल्या डब्लूटीए स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मुंबईतील टेनिसशौकिनांना अव्वल टेनिसपटूंचा खेळ पाहता यावा, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. डब्लूटीए स्पर्धेसाठी सीसीआयमध्ये तात्पुरते स्टेडियम बांधणार आहोत. या स्पर्धेनंतर असोसिएशनतर्फे पुढील वर्षी तीन ते चार स्पर्धा भरवणार आहोत. त्यात पुरुष आणि महिलांच्या प्रत्येकी दोन स्पर्धा असतील,’’ असे अय्यर म्हणाले.

काही जिल्हय़ांमध्ये टेनिस अकादमी उभारण्याची योजना

महाराष्ट्रात यंदा १२ टेनिस स्पर्धा झाल्या. त्यापैकी सात स्पर्धा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात झाल्या. पुण्याशिवाय औरंगाबादमधील  स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. याबाबत अय्यर म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात टेनिस पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवताना फारशा अडचणी येत नाहीत. औरंगाबादलाही अखिल भारतीय गुणांकन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले. आता नागपुरात स्पर्धा भरवणार आहोत. त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिकमध्येही स्पर्धा घेण्याची तयारी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनानंतर तेथील मुले टेनिसकडे वळताना दिसतात. त्यामुळे अधिकाधिक जिल्हय़ांमध्ये  टेनिस अकादमी उघडत आहोत. यात सर्वसामान्यांना परवडेल, अशा स्वरूपात टेनिस उपलब्ध करून दिले जाईल.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tennis stadium in mumbai