Tennis Premier League Auction: किया टेनिस प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला येत्या डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. यंदा ही स्पर्धा हैदराबादमध्ये खेळवली जाणार आहे. त्याआधी रविवारी (१२ ऑक्टोबर) मुंबईत टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात भारताचा युवा स्टार खेळाडू दक्षिणेश्वर सुरेश, रशियाची इरिना शिमानोविच आणि सोफ्या लान्सरे यांच्यावर प्रत्येकी १३-१३ लाखांची सर्वोच्च बोली लागली.
या स्पर्धेला पहिल्या हंगामापासून भारताचे दिग्गज टेनिसस्टार लिएंडर पेस, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा सारख्या खेळाडूंचा वारसा आहे. यासह. या लिलाव सोहळ्याला महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या प्रेसिडेंट अमृता फडणवीस यांनी देखील हजेरी लावली होती. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आठही फ्रेंचायझींमध्ये नवख्या आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली.
भारताचा स्टार टेनिसपटू दक्षिणेश्वर सुरेशवर १३ लाखांची विक्रमी बोली लागली. सुरेशला लखनौ ब्लेझर्सने आपल्या संघात स्थान दिलं. यासह गतविजेत्या जीएस दिल्ली एसेस संघाने बेल्जियमच्या सोफिया कोस्टोलासवर १३ लाख रूपयांची बोली लावली आणि आपल्या संघात स्थान दिलं. इरिना शिमानोविचला गुजरात पँथर्सने तर सोफ्या लान्सरे हैदराबाद स्ट्राईकर्सने १३ लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं.
तसेच स्थानिक टेनिस चाहत्यांचा आवडता संघ असलेल्या ‘मुंबई रॉयल्स’ने संघाने देखील स्टार खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं. या संघाने जागतिक क्रमवारीत ९९ वर असलेल्या फ्रान्सच्या टेरेन्स अटमानेच्या नेतृत्वाखाली भारताचा दुहेरी खेळाडू निकी पूनाचा (₹७.२० लाख) आणि क्रोएशियाची तारा वुएर्थ (₹७ लाख) यांना संघात समाविष्ट करून समतोल साधला. गुडगाव संघाने रोहन बोपण्णासह भारताच्या श्रीवल्ली भामिडीपतीला (₹७ लाख) संधी दिली, तर राजस्थान रेंजर्सने ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या रिंकी हिजिकाताच्या साथीला श्रीराम बालाजीला (₹८ लाख) निवडले.
