भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी (साइ) मानधनाच्या मुद्दय़ावरून झालेल्या मतभेदानंतर तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न ‘साइ’कडून सुरू आहेत. या प्रकरणी लवकरच तोडगा काढण्यात येईल आणि वॉल्श हेच प्रशिक्षकपदी कायम असतील, असे आश्वासन ‘साइ’ महासंचालक जिजी थॉमसन यांनी दिले आहे. वॉल्श यांच्याशी नव्याने करार करण्यात येणार असल्याचे समजते.
थॉमसन यांनी मंगळवारी वॉल्श यांची भेट घेऊन या पदावर कायम राहण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केल्याचे समजते. ‘‘साइच्या कार्यालयात आल्यानंतर मी वॉल्श यांना भेटलो होतो. माझे ‘साइ’शी कोणतेही मतभेद नाहीत, असे त्यांनी मला सांगितले. हे प्रकरण लवकरच मार्गी लागेल. त्यामुळे वॉल्श हेच भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील, असा विश्वास आहे,’’ असे थॉमसन यांनी सांगितले.
आपल्या अटींनुसार नवीन करार करण्यात आला तर आपण आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी तयार आहोत, असे संकेत वॉल्श यांनी दिले आहेत. वॉल्श यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे का, असे विचारले असता थॉमसन म्हणाले, ‘‘वॉल्श यांनी राजीनामा मागे घेतला असून करारानुसार त्यांनी एका महिन्याची नोटिसही दिली आहे. त्यामुळे ते १९ नोव्हेंबपर्यंत प्रशिक्षकपदी कायम आहेत. त्याआधीच त्यांच्याशी नवीन करार करण्यात येईल किंवा विद्यमान करारात सुधारणा करता येईल. राजीनाम्यानंतर क्रीडा मंत्रालय आणि ‘साइ’ने वेगाने पावले उचलल्याबद्दल वॉल्श यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच भारतीय हॉकीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 23rd Oct 2014 रोजी प्रकाशित
टेरी वॉल्श यांची मनधरणी
भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी (साइ) मानधनाच्या मुद्दय़ावरून झालेल्या मतभेदानंतर तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न ‘साइ’कडून सुरू आहेत.
First published on: 23-10-2014 at 01:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terry walsh takes back resignation