Tragic Football Player Dies Lightning Strike Thailand Match: फुटबॉलच्या मैदानावर एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सामना सुरू असताना मैदानावर खेळणाऱ्या एका फुटबॉलपटूच्या अंगावर वीज कोसळली. या भीषण अपघातात त्या खेळाडूचा मैदानावरच दुर्दैवी मृत्यू झाला. वीज पडताच इतर खेळाडू आणि मैदानावरील उपस्थित हादरले. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, खेळाडूच्या अशा अकस्मात मृत्यूमुळे संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
थायलंडमधील फुटबॉल सामन्यादरम्यान वीज कोसळून एका खेळाडूचा मृत्यू झाला असून, त्या मलेशियन खेळाडूसह आणखी १२ जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (४ ऑगस्ट) संध्याकाळी थायलंडच्या दक्षिणेकडील नराथिवात प्रांतातील सुंगाई गोलोक शहरात घडली. सुंगाई गोलोकचे पोलीस प्रमुख थुन सिरिखुंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसात सुमारे सायंकाळी ५.३० वाजता ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेदरम्यान सांतिफाप स्टेडियमवर प्रादेशिक गोलोक एफए कप फुटबॉल स्पर्धेचा उपांत्य सामना सुरू होता, असेंमलेशियन वृत्तसंस्था न्यू स्ट्रेट्स टाइम्सने वृत्त दिलं आहे. अचानक विजेचा कडकडाट होताच मैदानावरील अनेक खेळाडू आणि संबंधित व्यक्तींना विजेचा फटका बसला. या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हा सामना अबू x नोंग सिरिन आणि SAMCOLT या संघांदरम्यान खेळला जात होता. SAMCOLT हा थायलंड आणि मलेशियातील खेळाडूंचा मिश्र संघ आहे. पोलीस प्रमुख सिरिखुंत यांच्या माहितीनुसार, गोलोक एफए कप स्पर्धेत केलांतन एफसीसारखे इतर मलेशियन संघही सहभागी आहेत. सुंगाई गोलोक हे शहर थायलंड आणि मलेशियाच्या केलांतन राज्याच्या सीमेच्या जवळ वसलेलं आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या खेळाडूची ओळख २४ वर्षीय सोफवान अवे अशी पटली आहे. तो थर्ड टियर क्लब याला एफसीचा (Yala FC) विंगर होता. थाई एनक्वायररच्या वृत्तानुसार, या स्पर्धेत तो अबू x नोंग सिरिन संघाकडून खेळत होता, मात्र याबाबत काही परस्परविरोधी वृत्तेही समोर आली आहेत. सोफवान यापूर्वी पट्टानी एफसीकडून खेळला होता आणि घटनेच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्याने याला एफसीसोबत करार केला होता.
मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता थाई पोलिसांना आपत्कालीन कॉल मिळाला आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे सोफवान गंभीर अवस्थेत आढळून आला. मलेशियन वृत्तसंस्था बर्नामाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस प्रमुख थुन सिरिखुंत म्हणाले, “आपत्कालीन वैद्यकीय पथकाने त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र या घटनेत झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला.”
पोलीस प्रमुखांनी सांगितलं की, या घटनेत जखमी झालेल्या मलेशियन खेळाडूची ओळख २२ वर्षीय मोहम्मद अलीफ एझाहान झुल्किफली अशी झाली आहे. न्यू स्ट्रेट्स टाइम्सच्या वृत्तानुसार, अलीफ हा या फुटबॉल स्पर्धेत SAMCOLT संघाकडून खेळत होता. सोफवानच्या मृत्यूनंतर याला एफसी आणि थायलंड फुटबॉल असोसिएशन यांनी शोक व्यक्त केला आहे.
