पीटीआय, बँकॉक : ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने शुक्रवारी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीला तीन गेममध्ये पराभूत करत थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सहाव्या मानांकित सिंधूने जपानच्या दुसऱ्या मानांकित यामागुचीवर २१-१५, २०-२२, २१-१३ असा ५१ मिनिटे चाललेल्या लढतीत विजय मिळवला. हा सिंधूचा जगज्जेत्या यामागुचीवरील १४वा विजय ठरला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन यू फेईशी होणार आहे. याआधी, आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत झालेल्या उभय खेळाडूंमधील लढतीत पंचांनी एक गुणाचा दंड ठोठावल्यामुळे नाराज झालेल्या सिंधूने सामना गमावला होता.

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. सिंधूने काही चांगले फटके मारत यामागुचीच्या अडचणी वाढवल्या आणि पहिल्या गेमच्या मध्यांतरापर्यंत ११-९ अशी आघाडी मिळवली. यानंतर सिंधूने सलग सात गुणांची कमाई करत गेम २१-१५ असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने चांगली सुरुवात केली असली तरीही यामागुचीने आपला खेळ उंचावत गुण मिळवले. एकवेळ १६-१६ अशा बरोबरी होती. मात्र, यामागुचीने गेम २२-२० असा जिंकत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सामन्याच्या निर्णायक गेममध्ये सुरुवातीपासूनच सिंधूने यामागुचीला गुण कमावण्याची कोणतीच संधी दिली नाही. यामागुचीने काही चुका केल्या. याचा फायदा सिंधूने उचलत हा गेम २१-१३ असा जिंकत सामन्यात विजय मिळवला.