सिडनी : ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ कायम ठेवला आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे तारांकित वेगवान गोलंदाज अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने त्यांना या सामन्यालाही मुकावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे दिवस-रात्र (प्रकाशझोतात) खेळविला जाणार आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना दोन दिवसांतच जिंकला होता. कमिन्स दुसऱ्या कसोटीलाही मुकणार आहे, पण तो तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जेक वेदराल्ड, उस्मान ख्वाजा, मार्नस लबूशेन, कॅमरून ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड, ब्रेंडन डॉगेट, नेथन लायन, जोश इंग्लिस, मायकल नीसर, ब्यू वेबस्टर.

सलामीचा प्रश्न…

पहिल्या कसोटीत उस्मान ख्वाजाच्या पाठदुखीने डोके वर काढले होते. यानंतरही डावखुरा सलामीचा फलंदाज ख्वाजाचे संघातील स्थान कायम राहिले आहे. अर्थात, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. त्यामुळे ख्वाजाच्या तंदुरुस्तीबरोबर ऑस्ट्रेलियासमोर सलामीच्या फलंदाजांचा प्रश्न कायम आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ख्वाजाच्या अनुपस्थितीत ट्रॅव्हिस हेडने सलामीला येताना झंझावाती शतक साकारले. त्यामुळे आता हेडलाच सलामीला खेळवायचे की ख्वाजाला संधी द्यायची, असा प्रश्न ऑस्ट्रेलियासमोर आहे.