‘आयपीएल’ सट्टेबाजीप्रकरणी केल्या जाणाऱ्या ढिसाळ तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागावर ताशेरे ओढत महानगरदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा सट्टेबाजांना आणखी पोलीस कोठडी देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. या बुकींची रवानगी ५ जूपर्यंत न्यायालयीन कोठडीत केली. न्यायालयीन कोठडी सुनावताच सहाही सट्टेबाजांनी जामिनासाठी अर्ज केला असून २४ मे रोजी त्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
अनेक संधी देऊनही तपास अधिकाऱ्यांना कुणी आणि कशी फसवणूक केली हे सिद्ध करता आलेले नाही. त्यानंतरही आरोपींवर फसवणुकीचे आरोप लावण्यात आले आहेत, अशा शब्दांत अतिरिक्त महानगरदंडाधिकारी एम. एन. सलीम यांनी पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले आणि आरोपींना आणखी पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची मागणी फेटाळून लावली. आयटी कायदा, मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा तसेच भादंविच्या विविध कलमांअंतर्गत रमेश व्यास, पांडुरंग कदम, अशोक व्यास, नीरज शहा, प्रवीण बेरा आणि पंकज शहा ऊर्फ लोटस अशा सहा सट्टेबाजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच त्या मुद्दय़ांवर आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणीवरूनही न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले. फरारी सट्टेबाजांविषयी अधिक माहिती मिळविण्याच्या मुद्दय़ावर पोलिसांनी २० मे रोजी आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती. बुधवारीही याच मुद्दय़ाच्या आधारे पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करीत होते. तसेच मंगळवारीच अटक करण्यात आलेला अभिनेता विंदू दारा सिंग याच्यासमोर या सट्टेबाजांचा आमना-सामना करून त्यांच्याकडून या सट्टेबाजीबाबत माहिती मिळवायची असल्याचेही पोलिसांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. परंतु पोलीस कोठडी वाढवून देण्यासाठी योग्य ते कारण पोलिसांकडे नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी देण्यास नकार देत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.