डेन्मार्कची घोडदौड!

पहिल्या सत्रात थॉमस डेलानी आणि कास्पेर डोलबर्ग यांनी साकारलेल्या गोलमुळे डेन्मार्कने शनिवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा २-१ असा पराभव केला.

चेक प्रजासत्ताकला २-१ असे हरवत उपांत्य फेरीत आगेकूच

पहिल्या सत्रात थॉमस डेलानी आणि कास्पेर डोलबर्ग यांनी साकारलेल्या गोलमुळे डेन्मार्कने शनिवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा २-१ असा पराभव केला. यासह डेन्मार्कने १९८४नंतर प्रथमच युरो चषकाची उपांत्य फेरी गाठली. डेन्मार्कचा हा चेक प्रजासत्ताकवरील तिसरा विजय ठरला.

हृदयविकाराच्या झटक्यामुळे मैदानावर कोसळलेल्या ख्रिस्तियन एरिक्सन प्रकरणानंतर पेटून उठलेल्या डेन्मार्कने उपांत्यपूर्व फेरीतही दमदार कामगिरीची नोंद केली. उपउपांत्यपूर्व फेरीत वेल्सचा ४-० असा धुव्वा उडवल्यानंतर डेन्मार्कने चेक प्रजासत्ताकविरुद्ध पाचव्या मिनिटालाच आघाडी घेतली. थॉमस डेलानी याने चेंडूला हेडरद्वारे गोलजाळ्यात पोहोचवल्यामुळे डेन्मार्कच्या चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण आले.

पहिल्या सत्राच्या अखेरीस डेन्मार्कने कास्पेर डोलबर्गच्या गोलमुळे सामन्यात २-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. जोकिम माहले याच्या पासवर डोलबर्गने चेंडूला सहजपणे गोलजाळ्याची दिशा दाखवली. त्याने मारलेला फटका चेक प्रजासत्ताकचा गोलरक्षक टोमास वाकलिच यालाही अडवता आला नाही. डेन्मार्कने यंदाच्या युरो चषकात तब्बल ११ गोल झळकावण्याची करामत केली. कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्यांची ही सर्वाधिक गोलसंख्या ठरली.

दुसऱ्या सत्रात चेक प्रजासत्ताकने संघात दोन बदल केला. त्यानंतर त्यांच्या आक्रमणाला धार आली. जोरदार हल्ले चढवत असतानाच पॅट्रिक शिकला यंदाच्या युरो चषकात पाचवा गोल झळकावण्याची संधी मिळाली. ४९व्या मिनिटाला व्लादिमिर कौफालने दिलेल्या पासवर शिकने गोल लगावत चेक प्रजासत्ताकला सामन्यात पुनरागमन करून दिले. यासह शिकने यंदाच्या पर्वात सर्वाधिक पाच गोल करणाऱ्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला गाठले. चेक प्रजासत्ताकने त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण डेन्मार्कच्या बचावासमोर त्यांना बरोबरी साधता आली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The czech republic advanced to the semifinals ssh

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या