अ‍ॅथलेटिक्सच्या इतिहासातील जगातील सर्वात वेगवान चार धावपटूंमधील टायसन गे आणि असाफा पॉवेल हे उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे अ‍ॅथलेटिक्सविश्व हादरून गेले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती जमैकाची महिला धावपटू शेरॉन सिम्पसनही उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे.
२००७मध्ये १०० मीटर शर्यतीतील जागतिक सुवर्णपदक विजेता आणि सर्वात वेगवान पुरुष ठरलेला अमेरिकेचा टायसन गे याने दोषी आढळल्यानंतर लगेचच मॉस्को येथे पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. मे महिन्यात झालेल्या अमेरिका ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत गे याच्या ‘अ’ नमुना चाचणीत त्याने उत्तेजके घेतल्याचे अमेरिका उत्तेजक विरोधी संस्थेने (यूएसएडीए) समोर आले आहे. मात्र ‘ब’ नमुना चाचणी अद्याप व्हायची असल्याने गे याला दोषी मानता येणार नाही, असे यूएसएडीएने म्हटले आहे. ‘‘नक्की काय घडले, हे मलासुद्धा माहीत नाही. मात्र याविषयी मी आत्ताच काहीही बोलणार नाही. मी शिक्षा भोगण्यास तयार आहे. मी पुन्हा अ‍ॅथलेटिक ट्रॅकवर उतरेन, असा विश्वास आहे,’’ असे गे याने सांगितले.
माजी विश्वविक्रमवीर असाफा पॉवेल हा मॉस्को येथील स्पर्धेसाठी झालेल्या जमैकाच्या सराव शर्यतीत दोषी आढळला आहे. त्याने ऑक्सिलोफ्राइन हे उत्तेजक घेतल्याचे उघड झाले आहे. १०० मीटर शर्यतीत पॉवेलने रचलेला विश्वविक्रम २००८पर्यंत अबाधित होता. मात्र त्याचा सहकारी युसेन बोल्टने तो मोडीत काढला. बीजिंग ऑलिम्पिक २००८मध्ये त्याने ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत जमैकाला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
‘‘मी कोणतेही वाईट कृत्य केलेले नाही. नियम मोडतील, अशी कोणतीही उत्तेजके मी जाणीवपूर्वक घेतलेली नाहीत. कुटुंबीय, मित्र आणि जगभरातील माझ्या चाहत्यांसाठी मी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे,’’ असे पॉवेलने सांगितले.