सचिनला असलेल्या भीतीतही गोष्ट दडलेली आहे. अर्थात, ती क्रिकेटमधील कधीच नव्हती. ‘‘नैसर्गिक आपत्तीची मला सर्वाधिक भीती वाटते. अशा आपत्तीत कुणी काही करू शकत नाही. प्रत्येकासाठी ही भीती समान असते. मला याची नेहमीच काळजी वाटते. ही आपत्ती करोनासारखी निश्चित नाही. जर एखाद्या घरात करोनाने बाधित व्यक्ती असेल, तर योग्य काळजी घेतल्यास बरे होता येते. मी येथे भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी अशा संकटांबद्दल बोलतोय. गुजरातमध्ये २००० साली झालेला भूकंप मला आजही आठवतो आहे. त्याचप्रमाणे मी ज्या इमारतीत होतो, ती ज्या पद्धतीने हादरली, ते पाहून माझी झोपच उडाली होती.’’
‘‘माझ्या घरच्या एका खिडकीतून मी माऊंट मेरी चर्च पाहू शकत होतो, मला शिवाजी पार्कही दिसत होते. अशी संकटे पुन्हा येऊ नयेत अशीच मी सदैव प्रार्थना करतो. म्हणूनच मला अशा नैसर्गिक संकटांची भीती वाटते. क्रिकेटची भीती मला कधीही वाटली नाही.
भीती नाही, पण अलौकिक प्रतिभा असलेल्या व्यक्तीला स्वत:बद्दल शंका असते का?
‘‘केवळ एकदाच’’ असे सचिन म्हणतो. ‘‘पदार्पणाच्या कसोटीत पाकिस्तानविरुद्ध पहिला डाव खेळल्यानंतर, मी खरंच या स्तरावर खेळू शकतो का अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली होती.’’
१६ वर्षीय सचिनला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्याची संधी दिली गेली नाही. मात्र, त्याला इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनुस आणि अब्दुल कादीर यांच्याविरुद्ध खेळायला उतरवले, तेही पाकिस्तानात.
पदार्पणाची वेळ सचिन कधीही विसरणार नाही. भारताची अवस्था ४ बाद ४१ अशी दयनीय असताना पांढरे हेल्मेट परिधान करून त्याने मैदानात प्रवेश केला होता. त्या वेळी पाकिस्तानी गोलंदाजांनी उसळते चेंडू आणि वेगवान रिव्हर्स स्विंगने त्याला हैराण केले. सचिनने अशाही स्थितीत झटपट दोन चौकार लगावले. वकार युनुसने त्याला बाद केले तेव्हा सचिनमधील कच्चा दुवा उघड झाला. चेंडू पॅडला लागून यष्टींवर आदळला. शर्टच्या बाहीने चेहरा पुसत सचिनने मैदान सोडले, तेव्हा स्वत:बद्दल असलेली चिंता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.
‘‘हा स्तर माझ्यासाठी नाही, असे मला त्या वेळी. माझ्या मनात बऱ्याच शंका होत्या. ही माझी पहिली आणि अखेरची कसोटी असेल असे मला वाटू लागले. ड्रेसिंगरूमध्ये मी कमालीचा अस्वस्थ होतो.’’
संघातील सहकाऱ्यांना ते जाणवले आणि त्यांनी सचिनचे सांत्वन केले. ‘‘कर्णधार श्रीकांत यांचे मोठे सहकार्य मिळाले. त्या वेळी मी व्यवस्थापक चंदू बोर्डे, रवी शास्त्री यांच्याशी गप्पा मारल्या. संजय मांजरेकर, सलिल अंकोला आणि मी एकाच खोलीत राहत होतो. मला आठवतंय की तेव्हा मी खूप घाई केली असे रवीला (शास्त्री) मराठीतून सांगितले. तेव्हा रवी म्हणाला की, हो, तू शाळेचा सामना असल्यासारखा खेळलास. लक्षात ठेव समोर जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. तू त्यांचा आदर करायला हवा.’’
‘‘त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधली की, पुढच्या सामन्यात मी धावफलक पाहणार नाही. फक्त घडय़ाळाकडे पाहणार.’’
त्या घडय़ाळाची प्रतिमा आजही सचिनच्या मनात कोरली गेली आहे. ‘‘ते ड्रेसिंगरूमच्या एकदम समोरच्या बाजूला, ‘थर्ड मॅन’च्या मागे होते. किती धावा केल्या याची तमा न बाळगता पहिला अर्धा तास फलंदाजी करण्याचा मी निर्णय घेतला. ‘खेळपट्टीवर अर्धा तास उभा राहा, मग काय होते ते पाहा’ असे स्वत:ला बजावले होते. तीस मिनिटे झाली. मी एकदम उत्तम खेळत होतो. आता मी खेळपट्टीवर स्थिरावलो आहे असे स्वत:ला सांगितले. ती तीस मिनिटे मला आयुष्यातील सर्वात महत्त्वाची वाटतात. मी या स्तरावर खेळू शकतो हे मला त्यावेळी पटले.’’
सचिनच्या कारकीर्दीत अनेक अडथळे आले. जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा सामना केला, ‘टेनिस एल्बो’ची दुखापत, अपेक्षांचे ओझे आणि वय; पण त्याने कधीही स्वत:वर शंका घेतली नाही. त्या दिवशी त्याने चार तासांत ५७ धावा केल्या. ‘‘त्या दिवशी कदाचित मला आईचे आशीर्वाद महत्त्वाचे वाटले,’’ असे सचिन सांगतो.
‘‘चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात वकारने माझ्या नाकाच्या दिशेने गोलंदाजी केली. नाकातून रक्त वाहू लागले. तेव्हा मोठा भाऊ अजित कसोटी सामना पाहण्यासाठी सियालकोटला आला होता. पदार्पणाच्या कसोटी मालिकेतील हा अखेरचा सामना होता. त्या वेळी आजसारखी बंधने नव्हती. त्यामुळे अजित लहान भावाची तपासणी करण्यासाठी ड्रेसिंगरूममध्ये जाऊ शकत होता.’’
खेळपट्टीवर सचिन आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात चर्चा होत होती. सचिन नवज्योतला सांगत होता, ‘मैं खेलुंगा’ (मी खेळन). तेव्हा जावेद मियांदादने आम्हाला टोकले होते. जावेद म्हणाला होता, ‘‘तेरा नाक बिल्कुल टूट गया. तुझे हॉस्पिटल जाना पडेगा’’ (तुझे नाक तुटले आहे. तुला रुग्णालयात जावे लागेल.) त्याला कदाचित मला परत पाठवायचे होते, कारण, तेव्हा भारताची स्थिती ४ बाद १३८ अशी होती. आमचा पाचवा गडी बाद झाला असता, तर आम्ही अडचणीत सापडलो असतो.’’
‘‘तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खानही पुढे आला. ‘तू इसको छोड’ (त्याला एकटे सोड) असे इम्रानने जावेदला सांगितले. मी या सगळय़ासाठी तयार होतो. मला त्यांच्या बडबडीचे काहीच वाटले नाही. शिवाजी पार्कवर खूप वेळ घालवला असल्यामुळे मला या सगळय़ाची सवय होती.’’ तीन तास खेळून तेंडुलकरने केलेल्या ५७ धावांच्या खेळीने भारताला सामना अनिर्णित राखता आला आणि मालिका बरोबरीत सोडवता आली.
