पहिल्या सामन्यामध्ये यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यावर भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ मंगळवारी एकमेकांसमोर पहिल्या सामन्यात उभे ठाकतील तेव्हा त्यांच्या मनात असेल ती पहिल्यावहिल्या विजयाची आस. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा सहज पराभव केला होता, तर भारताचा यजमानांबरोबरचा सामना चांगलाच रंगतदार झाला. त्यामुळे या मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवल्यावर संघांचे मनोबल चांगले उंचावू शकणार आहे.
पहिल्या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने दमदार शतक झळकावले होते, त्याला सुरेश रैनाची चांगली साथ मिळाली होती, पण या जोडीला मोठी भागीदारी करण्यात अपयश आले. संघातील विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यात धोनी ज्या वेळी बाद झाला तिथून भारतीय संघाच्या धावा आटत गेल्या. गोलंदाजीमध्ये आर. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारनेही चांगली गोलंदाजी केली असली तरी त्याचे ४९ वे षटक भारतासाठी महागडे पडले आणि या षटकातच भारताने सामना गमावला. या सामन्यात मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या या सामन्यातील समावेशाबद्दल साशंकता आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव प्रभावी ठरत असला तरी तो फार महागडा ठरत असून त्याला गोलंदाजीमध्ये सातत्य राखता आलेले नाही.
इंग्लंडच्या संघात कर्णधार इऑन मॉर्गन वगळता एकही फलंदाज चांगल्या फॉर्मात दिसत नाही. संघाला इयान बेल आणि रवी बोपारासारख्या अनुभवी फलंदाजांकडून मोठी अपेक्षा असेल. या सामन्यात वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन खेळण्याची शक्यता आहे, दुखापतीमुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. अँडरसनच्या येण्याने इंग्लंडच्या गोलंदाजीला अधिक बळकटी येऊ शकते.
भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे कोणत्याही संघाला गाफील राहून नक्कीच चालणार नाही. एका रंजक सामन्याची अनुभूती रसिकांना या सामन्यांमधून मिळेल, अशी आशा आहे.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा.
इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टिव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवल आणि ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : सकाळी ८.५० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वाहिनीवर.

जॉर्ज बेलीवर एका सामन्याची बंदी
मेलबर्न : इंग्लंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील सलामीच्या लढतीत षटकांची अपेक्षित गती न राखता आल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. २०१४ मध्येही षटकांची गती न राखल्याबद्दल बेलीला दंड ठोठावण्यात आला होता. दोन वेळा या प्रकारची शिक्षा झाल्यामुळे बेलीवर एका सामन्याची बंदी घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी घेतला. या शिक्षेमुळे बेली इंग्लंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील लढतीत खेळू शकणार नाही. मायकेल क्लार्कच्या मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे बेलीकडे हंगामी कर्णधारपद सोपवण्यात आले होते. बेलीवर बंदी घालण्यात आल्याने स्टिव्हन स्मिथ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. जॉर्ज बेलीच्या अनुपस्थितीत कोणत्या फलंदाजांला संधी मिळणार याविषयी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घोषणा केलेली नाही. दरम्यान दुखापतीमुळे गोलंदाजी करू न शकणारा मिचेल मार्श विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे.

कसोटीतील अपयशानंतर एकदिवसीय प्रकारात धावा करता आल्याने आनंद झाला आहे. दोन वर्षांनंतर मी कसोटीत पुनरागमन केले, परंतु मला अजिबातच धावा करता आल्या नाहीत. संघातील प्रत्येकाने मला पाठिंबा दिला. मी खूप निराश झालो होतो. मी खूप मेहनत घेतली होती. प्रदीर्घ कालावधीनंतर मला कसोटीत संधी मिळाली पण मी ही संधी वाया घालवली. कसोटीतील अपयश विसरून एकदिवसीय प्रकारात धावा करता आल्या याचा आनंदच आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर मी अथक सराव केला. उसळत्या चेंडूचा सामना करण्याबाबत बरीच चर्चा होते, मात्र मी त्यासाठी सचिन तेंडुलकर आणि प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला आहे.
– सुरेश रैना, भारतीय फलंदाज