The Hundred League, Will Jacks Catch: इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड क्रिकेट लीग २०२६ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक थरारक सामने पाहायला मिळाले आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यात लंडन स्पिरीट आणि एमआय लंडन हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात एमआय लंडन संघाने ४ गडी राखून विजयाची नोंद केली. एमआयला हा सामना जिंकून देण्यात सिकंदर रझाने मोलाची भूमिका बजावली. तर क्षेत्ररक्षण करताना विल जॅक्सने बाऊंड्रीलाईनवर भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या लंडन स्पिरीट संघाने १०० चेंडूंमध्ये ५ गडी बाद १६० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या एमआय लंडन संघाने ९४ चेंडूंमध्ये दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि ६ गडी राखून विजयाची नोंद केली. तर झाले असे की, पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लंडन स्पिरीट संघाकडून लुआन ड्रे प्रिटोरियसने दमदार सुरुवात करुन दिली. त्याने २८ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५२ धावांची खेळी केली. या पण नॅथन सॉटरने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. नॅथनने टाकलेल्या ओव्हरपिच चेंडूवर लुआन ड्रे प्रिटोरियसने समोरच्या दिशेने मोठा फटका मारला. चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर जात होता. पण नेमकं तेव्हाच विल जॅक्सने उडी मारुन आधी चेंडू अडवला, त्यावेळी त्यानंतर तो बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि पुन्हा आत येऊन डाईव्ह मारुन झेल पकडला. या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात एमआय लंडनने नाणेफेक जिंकून लंडन स्पिरीट संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमत्रंण दिलं. या संघाकडून लुआन ड्रे प्रिटोरियस आणि जॉनी बेअरस्टो या दोन्ही फलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिली. बेअरस्टो १३ धावा करुन माघारी परतला. पण लुआन ड्रे प्रिटोरियसने दमदार अर्धशतकी खेळी केली. पण त्याच्या खेळीला विल जॅक्सच्या भन्नाट झेलमुळे पूर्णविराम लागला. दरम्यान लंडन स्पिरीट संघाने १०० चेंडूंमध्ये १६० धावा केल्या.
एमआय लंडन संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या एमआय लंडनकडून विल जॅक्सने ९ चेंडूंमध्ये १८, तर जेम्स विंगने १३ चेंडूंमध्ये १५ धावांची खेळी केली. त्यानंतर सॅम करन आणि निकोलस पूरन या दोघांनी मिळून एमआयचा डाव सावरला. दोघांनी मिळून ४३ धावांची भागीदारी केली. यादरम्यान करनने ३३ धावांची खेळी केली. तर शेवटी सिकंदर रझाने १६ चेंडूंमध्ये ३२ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
