Viral Single Hand Shot Video In The Hundred League: टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाज तुम्हाला कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्हचे फटके मारताना क्वचितच पाहायला मिळत असतील. कारण १२० चेंडूंच्या या खेळात फलंदाज प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पार पोहोचवण्याच्या प्रयत्नात असतात. यादरम्यान ते असे काही आगळेवेगळे फटके मारतात, जे पाहून सर्वच आश्चर्यचकीत होतात. असाच काहीसा फटका इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड लीग स्पर्धेत एका महिला फलंदाजाने मारला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिलांच्या द हंड्रेड लीग स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान डेविना पेरिन नावाच्या फलंदाजाने एका हाताने भन्नाट शॉट मारला, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा बर्मिंघम फोनिक्स आणि एमआय लंडन महिला संघ यांच्यात झालेल्या सामन्यातील आहे. या सामन्यात बर्मिंघम फोनिक्स संघाकडून खेळणाऱ्या सलामीवीर फलंदाज डेविना पेरिनने फिरून एका हाताने स्कुप शॉट मारला. ती रिव्हर्स स्वीप किंवा स्विच हिट खेळण्याच्या प्रयत्नात होती. पण गोलंदाजाने आधीच अचूक अंदाज घेतला आणि चेंडू तिच्यापासून दूर ठेवला. त्यामुळे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसला असता. पण डेविनानेही अंदाज घेऊन एका हाताने चेंडू किपरच्या डोक्यावरुन मारला. या आगळ्या वेगळ्या शॉटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

डेविनाचा आगळा वेगळा शॉट

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर डेविनाचा रिव्हर्स फिरुन फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू ऑफ स्टंप लाईनवर आहे, हे लक्षात येताच डेविनाने एका हाताने चेंडू किपरच्या डोक्यावरुन ४ धावांसाठी ढकलून दिला. हा शॉट पाहून गोलंदाज, यष्टीरक्षक आणि समालोचक देखील आश्चर्यचकीत झाले. पण या भन्नाट शॉटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

डेविनाने असा आगळा वेगळा शॉट मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या हंगामात तिने असाच काहीसा एका हाताने शॉट मारला होता, ज्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. २०२६ मारलेला शॉट हा ऑफ स्टंपच्या बाहेरून मारला आहे. पण याआधी २०२५ मारलेला शॉट हा आणखी खास होता. कारण चेंडू टप्पा पडताच आता आला, तरीदेखील तिने एका हाताने किपरच्या डोक्यावरुन ढकलून दिला होता.