मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजला चीतपट केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाने वेगवान गोलंदाजीचा कसून सराव केला.
डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, व्हरनॉन फिलँडर या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाचा भारतीय संघाला सामना करायचा आहे. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टय़ाही भारतीय खेळपटय़ांच्या तुलनेत वेगवान आणि चेंडूला उसळी मिळण्यासाठी अनुकूल आहेत. आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भंबेरी उडू नये यासाठी भारतीय फलंदाजांनी जोरदार सराव केला. या संघातील सहा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेतील खेळपटय़ांवर खेळण्याचा अनुभव आहे. ही जमेची बाजू असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी सांगितले.