‘मी प्रेमनगरचा राजा, तू फुलवंती मधुराणी..’ या गीताच्या ओळींप्रमाणेच त्या दोघांचीही आपापल्या क्षेत्रात खास ओळख आहे. या कथेतील तो म्हणजे मॉर्नी मॉर्केल. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याचा प्रमुख आधारस्तंभ. प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवण्यात वाकबदार. ती म्हणजे रोझ केली. ऑस्ट्रेलियातील ‘चॅनेल नाइन’ या प्रथितयश वृत्तवाहिनीची क्रीडा पत्रकार. २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, तेव्हा मॉर्नी आणि रोझची भेट झाली. खेळाडू आणि क्रीडा पत्रकार यांच्या भेटींचे रूपांतर कालांतराने खासगी भेटींत होऊ लागले आणि ऑस्ट्रेलियन भूमीवर या दोघांची प्रेमकथा बहरली. काही महिन्यांनंतर आयपीएल आले आणि मॉर्नीसोबत रोझ भारत पर्यटनाला आली.

प्रेमरंगी रंगणाऱ्या या युगुलाने अखेर २०१४ मध्ये विवाहाचा निर्णय घेतला; परंतु या निर्णयात रोझची कारकीर्द डावावर लागली. तिने तडकाफडकी ‘चॅनेल नाइन’च्या नोकरीचा त्याग केला आणि पती मॉर्नीसोबत दक्षिण आफ्रिकेत सहजीवन घालवण्याचा निर्णय घेतला. नंतर सप्टेंबर २०१५ मध्ये रोझने अरियस या गोंडस मुलाला जन्म दिला. मग पुढच्याच वर्षी रोझ ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पध्रेच्या निमित्ताने क्रिकेट समालोचक म्हणून ‘नेटवर्क टेन’ वाहिनीवर दिसू लागली. रोझच्या कारकीर्दीची गाडी पुन्हा रुळावर आली, असे चित्र दिसत असतानाच मॉर्नीच्या निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेटविश्वाला हादरवले. कारकीर्द आणि कुटुंब या दोन आघाडय़ांवर आयुष्याचा प्रवास करताना ‘जरा विसावू या वळणावर..’ असे मॉर्नी-रोझप्रमाणेच आता अनेकांना वाटू लागले आहे.

‘‘सध्याच्या व्यग्र आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पत्रिकेमुळे बराचसा ताण येतो. परदेशी पत्नी आणि मुलाला वेळ देणे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुटुंबाला अग्रस्थान देऊन मी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करत आहे,’’ अशी कारणमीमांसा दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्नी मॉर्केलने केली. सध्या चालू असलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. अ‍ॅल्बीचा छोटा भाऊ ही ओळख मागे टाकणारा साडेसहा फुटांचा मॉर्नी हा ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे आणखी काही वष्रे तो सहज मैदान गाजवू शकतो; परंतु क्रिकेट सामन्यांची वाढती संख्या कौटुंबिक जीवनावर कुरघोडी करीत आहे, हे वास्तव स्वीकारताना त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याला हाच पर्याय योग्य वाटला.

तसे ‘उदंड जाहले सामने’ अशा सुरात गळा काढणारा मॉर्नी हा पहिलावहिला मुळीच नव्हे. क्रिकेटपासून बॅडमिंटनपर्यंत प्रत्येक खेळातील खेळाडू व्यावसायिकतेच्या अतिताणामुळे त्रस्त आहेत. ‘‘आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा कार्यक्रम अविरत आहे. आघाडीच्या खेळाडूंसाठी तो अयोग्य आहे. सलग स्पर्धामध्ये मी सहभागी होईन, पण जिंकण्याची खात्री देऊ शकत नाही,’’ अशी टीका सायना नेहवालने केली होती. तसेच भारताचा चाणाक्ष कर्णधार विराट कोहली अनुष्का शर्मासोबत विवाह करण्याच्या काही महिने आधीपासूनच आंदोलनाच्या पवित्र्यात होता. इतकेच नव्हे, तर महेंद्रसिंग धोनीला साथीला घेत त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची धुरा सांभाळणाऱ्या प्रशासकीय समितीची भेट घेतली. या बैठकीत त्याने ‘पगार वाढवा आणि अधिक विश्रांती द्या’ अशी जोरदार मागणीसुद्धा केली. धोनी क्रिकेट आणि कुटुंबाला पुरेसा न्याय देण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत फक्त मर्यादित षटकांचे सामने आणि आयपीएल खेळतो.

न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलमने दोन वर्षांपूर्वी कुटुंबाला अधिक वेळ देता यावा, याकरिता कारकीर्द ऐन बहरात असताना निवृत्तीचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॅडिनला क्रिकेट कारकीर्दीला स्थगिती द्यावी लागली. छोटी मुलगी मिया न्यूराब्लास्टोमाने आजारी होती. त्यामुळे त्याला कॅरेबियन दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले होते. प्रत्येकासाठी कुटुंब महत्त्वाचे असते, त्यामुळे त्यासाठी एखादा गंभीर निर्णय घेताना कसलाच पश्चात्ताप होत नाही, असे हॅडिनने म्हटले होते.

मॉर्नीच्या निमित्ताने सध्या तरी क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाचा विषय ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्रातील उलाढाल ही प्रचंड वाढली आहे. अनेक लीग आल्या आहेत. त्या अनुषंगाने मिळणारा पैसा हा प्रत्येकाला साद घालत आहे. त्यामुळे अनेक खेळांमधील खेळाडूंचे निवृत्तीचे वयसुद्धा थोडेसे पुढे गेले आहे; परंतु कुटुंबाला प्रथम पसंती देत मॉर्नी, ब्रँड यांच्यासारखा निर्णय घेणेसुद्धा काही जणांना योग्य वाटते आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

आता कोणताही खेळ हा एक उद्योग झालेला आहे. त्याचे अर्थकारणही तितकेच मोठे झाले आहे. आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते. यात मायदेशात आणि परदेशातील सामन्यांचा समावेश होतो. मात्र त्यातील मोकळा काळ शोधून क्रिकेट मंडळे छोटय़ा मालिकांचे नियोजन करतात. क्रिकेट मंडळांचे वाहिन्यांशी करार झालेले असतात. त्यामुळे करारानुसार सामन्यांची संख्या गाठणे आणि त्यातून उत्पन्न मिळवणे, हे लक्ष्य क्रिकेट मंडळांपुढे असते. या अतिरिक्त मालिका किंवा स्पर्धा याच क्रिकेटपटूंना थकवा आणणाऱ्या असतात. त्यामुळे मानसिक किंवा शारीरिक ताण पडू शकतो आणि मॉर्नीच्या म्हणण्याप्रमाणे कुटुंबाला वेळ देणे कठीण जाते; परंतु मॉर्नीसारखी उदाहरणे क्वचितच आढळतात. पूर्वी खेळाडूंची कारकीर्द मर्यादित असायची. आता मानसतज्ज्ञ, सरावतज्ज्ञ, फिजिओ यांच्या मदतीने खेळाडूंची कारकीर्द वाढते आहे. कारण खेळात पैसा आल्यामुळे अधिकाधिक खेळणेच महत्त्वाचे वाटते. या सर्व बाबतीत विश्रांतीचे व्यवस्थापन करणे, हेच कोणत्याही खेळाडूसाठी जास्त योग्य ठरेल.        – दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार

काही मोठे खेळाडू याविषयी बोलू लागल्याने याकडे लक्ष जात आहे. क्रिकेट किंवा अन्य काही मोठय़ा खेळांमध्ये किमान आंतरराष्ट्रीय वेळापत्रक तरी निश्चित असते. त्यामुळे खेळाडूंना आपल्या कोणते सामने खेळायचे आहे याचे नियोजन करता येते. मात्र भारतातील अनेक खेळांचा विचार केल्यास असे कोणतेही वेळापत्रकसुद्धा नसते. त्यामुळे बऱ्याचदा गणपती, दिवाळी अशा सणासुदीलाही स्पर्धा आयोजित केल्या जातात; परंतु खेळाच्या वाढत्या मागणीमुळे खेळाडूंना आपले वैयक्तिक आयुष्य जुळवून घ्यावे लागते. मात्र ही क्षमता तुमच्याकडे नसेल, तर त्याचा प्रचंड ताण येतो. आता स्पध्रेत उतरणाऱ्या प्रत्येकाकडून बक्षिसाची अपेक्षा असते. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि पालक यांच्यावर स्पर्धाच्या वेळापत्रकाचा ताण येतो. आयुष्यात एक असा काळ येतो, त्या वेळी कुटुंब आधी असे वाटायला लागते. याकडे आपण सकारात्मकतेने पाहायला हवे. अगदी प्रेमविवाह का असेना, परंतु कोणत्याही नात्याला तुम्ही पुरेसा वेळ देत नाही, तोवर त्याचा पाया भक्कम होत नाही. याचप्रमाणे मुलांच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्येही पालकांची उपस्थिती आवश्यक असते. त्यामुळे खेळाडूंकडून कामगिरीची अपेक्षा करीत असताना त्यांना विश्रांतीचा काळसुद्धा द्यायला हवा.          – नीता ताटके, क्रीडा मानसतज्ज्ञ