वृत्तसंस्था, पॅरिस ऑलिम्पिकमधील चार दशकांची पदकप्रतीक्षा संपवून टोक्योमध्ये कांस्यकमाई करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाकडून यंदा पॅरिसमध्ये दर्जेदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाच्या मोहिमेस आज, शनिवारपासून सुरुवात करणार असून सलामीला त्यांची न्यूझीलंडशी गाठ पडेल. स्पर्धेतील सर्वांत कठीण अशा ‘ब’ गटात समावेश असल्यामुळे क्षमतेच्या पलीकडे जाऊन सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान भारतीय खेळाडूंसमोर राहणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांपासूनचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ टोक्योमध्ये संपवला होता. या वेळी मात्र भारतीय संघाला पदकापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागू शकेल. ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियम, बलाढ्य ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना अशा तगड्या संघांचा भारताला साखळी फेरीतच सामना करावा लागणार आहे. न्यूझीलंड आणि आयर्लंड हे गटातील अन्य दोन संघच दुबळे मानले जात आहेत. सलग दुसऱ्या पदकाच्या दृष्टीने वाटचाल सुरू ठेवण्यासाठी भारताने साखळी फेरीत गटातील पहिल्या चार संघांत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना तीन सामने जिंकावेच लागतील. भारताला दिलासा देणारा घटक म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम या दोन संघांशी त्यांना अखेरीस खेळायचे आहे. त्यामुळे पहिले तीन सामने जिंकून आपले स्थान सुरक्षित करण्याची संधी भारताला मिळणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना क्षमतेच्या पलीकडे जाऊन खेळ दाखवावा लागेल यात शंका नाही.भारतीय हॉकीची भिंत म्हणून ओळखला जाणारा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशची भूमिका पुन्हा सर्वांत महत्त्वाची राहील. या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्यामुळे श्रीजेशला यशस्वी निरोप देण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. हेही वाचा >>>VIDEO: राहुल द्रविडचा लेक समित १८व्या वर्षी टी-२० लीगमध्ये खेळणार, लिलावात किती बोली लागली? भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असला, तरी क्रमवारीवर सामन्याचे निर्णय ठरत नाहीत. क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असताना भारताला विश्वचषक स्पर्धेत घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ न्यूझीलंडला कमी लेखण्याची चूक निश्चितपणे करणार नाही. ‘‘ऑलिम्पिकमध्ये कुठलाही सामना सोपा नसतो. आम्हाला ऑस्ट्रेलिया, बेल्जियमशी शेवटी खेळायचे आहे. त्यामुळे आधीच्या तीन सामन्यांवर आम्ही लक्ष केंद्रित करू,’’ असे भारताचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी सांगितले. भारतीय संघ सकारात्मक सुरुवात करण्यास निश्चितपणे उत्सुक असेल. संतुलित संघ ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेला भारतीय पुरुष हॉकी संघ संतुलित आहे. भारताच्या १६ सदस्यीय संघात ११ खेळाडू हे ऑलिम्पिक पदकविजेते आहेत. जरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, अभिषेक, राजकुमार पाल, संजय हे यंदा ऑलिम्पिक पदार्पण करणार आहेत. श्रीजेश आणि मनप्रीत सिंग यांची ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा असेल. हेही वाचा >>>Paris Olympics 2024 Opening Ceremony Highlights: नेशन ऑफ परेड पूर्ण, भारतीय दलाने वेधलं लक्ष हरमनप्रीतकडे लक्ष ललित उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग, अभिषेक आणि सुखजित या आक्रमकांवर गोल करण्याची भिस्त असेल. मनप्रीत, हार्दिक सिंग आणि विवेक सागर प्रसाद या मध्यरक्षकांवरही मोठी जबाबदारी राहील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगला आपला अनुभव पणाला लावावा लागेल. ● वेळ : रात्री ९ वा. ● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, २, जिओ सिनेमा अॅप