कारकीर्दीत अनेक पदके मिळवली आहेत. मात्र ऑलिम्पिकसाठी पात्रता पूर्ण करण्यासाठी खूप खडतर मार्ग स्वीकारावा लागला, असे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगटपटू शिवा थापाने सांगितले.
२२ वर्षीय शिवाने गतवर्षी जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. हे कांस्यपदक मिळवणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आशिया/ओशेनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. तो बॅन्टमवेट गटात भाग घेत असून, सलग दुसऱ्यांदा तो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे. लंडन येथे २०१२मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा तो सर्वात तरुण भारतीय खेळाडू होता. त्या वेळी तो १८ वर्षांचा होता. त्याने त्या वेळी पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीत सनसनाटी कामगिरी केली होती.
‘‘यंदा ऑलिम्पिकमध्ये अधिक खडतर लढतींना सामोरे जावे लागणार आहे. यंदाही ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्याच्या निर्धाराने मी सहभागी झालो होतो. उपान्त्य फेरीत विजय मिळविण्यासाठी मला खूप झुंज द्यावी लागली. जेव्हा माझे ऑलिम्पिक तिकीट निश्चित झाले त्या वेळी मला आनंदाने रडू आले. आता माझे लक्ष्य ऑलिम्पिक पदकाचे आहे. गतवेळी माझी पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. आता अनेक स्पर्धाचा अनुभव मला मिळाला आहे व त्याचा फायदा घेत पदकाचे स्वप्न साकार करायचे आहे. अनेक अन्य गोष्टींचा त्याग करीत फक्त सरावावर लक्ष केंद्रित करीत आहे. देशाच्या बॉक्सिंग संघटनेबाबत काय चालले आहे याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकावयाचा आहे,’’ असे थापाने सांगितले.