नवी दिल्ली : दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने साजरा केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडादिनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासी आणि खेळाडूंना शुभेच्छा देताना, अलीकडच्या काळात भारताने क्रीडा क्षेत्रात मिळविलेले यश बघता ही प्रगती आणि खेळाची लोकप्रियता अशीच वाढावी अशी आशा व्यक्त केली.

ध्यानचंद यांच्या वाढदिवशी २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे कौतुकही केले. तसेच क्रीडा राज्यमंत्री नितीश प्रामाणिक यांनीही या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘‘ध्यानचंद यांनी आपले जीवन हॉकीसाठी समर्पित केले होते. त्यांचाच आदर्श डोळय़ासमोर ठेवून अनेक खेळाडू आपला प्रवास करत आहेत. देशाला क्रीडा क्षेत्रात मजबूत करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया,’’ अशी सादही प्रामाणिक यांनी घातली.