scorecardresearch

FIFA World Cup जिंकणाऱ्या संघाला किती बक्षिस मिळणार पाहिलं का? T20 विश्वचषकाची रक्कमही वाटेल कवडीमोल

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी२०क्रिकेट विश्वचषकात ‌बक्षिसांची रक्कम ही फुटबॉल विश्वचषकाच्या रकमेपेक्षा अगदीच नगण्य आहे.

FIFA World Cup जिंकणाऱ्या संघाला किती बक्षिस मिळणार पाहिलं का? T20 विश्वचषकाची रक्कमही वाटेल कवडीमोल
प्रातिनिधीक छायाचित्र (लोकसत्ता)

आगामी काळात याच वर्षी फुटबॉल आणि क्रिकेट या दोन्ही खेळांचे विश्वचषक होऊ घातलेले आहेत. या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषक होणार आहे आणि याच वर्षाच्या शेवटी म्हणजे नोव्हेंबरमध्ये फुटबॉल विश्वचषकाचं बिगुल वाजणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी विश्वचषक सुरू होईल. भारताला त्यांचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५.६ मिलियन अमेरिकन डॉलर्सची  ‌बक्षिसे वाटली जाणार आहेत. मात्र, ही बक्षिसाची रक्कम फुटबॉल विश्वचषकाच्या रकमेच्या अगदीच नगण्य आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेल्या आकडेवारीनुसार, विजेता संघ १.६ मिलियन डॉलर (जवळपास १३ कोटी रुपये) इतकी रक्कम जिंकेल. उपविजेता संघ ०.८ मिलियन डॉलरचा (जवळपास ६.५ कोटी रुपये) मानकरी होईल. तर, उपांत्य सामन्यात पराभूत होणारे संघ ०.४ मिलियन डॉलर (जवळपास ३.२६ कोटी रुपये) इतकी रक्कम जिंकेल. सुपर १२ फेरीत प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला ४० हजार डॉलर (जवळपास ३३.६२ लाख रुपये) रुपयांची रक्कम मिळेल. सुपर १२ फेरीतून मधून बाहेर होणारा प्रत्येक संघ ७० हजार डॉलर (जवळपास ५७.०९ लाख रुपये) जिंकणार आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ ४० हजार डॉलर (जवळपास ३३.६२ लाख रुपये) आपल्या नावे करेल. अखेरीस पहिल्या फेरीतून बाहेर होणारा प्रत्येक संघ ४० हजार डॉलर (जवळपास ३३.६२ लाख रुपये) घेऊन जाईल.

हेही वाचा :  PAK VS ENG: पाकिस्तानची हाराकिरी, मायदेशातील टी२० मालिकेत इंग्लंडकडून ४-३ असा पराभव 

नोव्हेंबरमध्ये याचवर्षी २० तारखेपासून कतारमध्ये मानाचा दर चार वर्षांनी होणारा फिफा फुटबॉल विश्वचषक होणार आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबरला होणार आहे. जगातील सर्वात मोठा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉल विश्वचषकात तब्बल ४४० मिलियन अमेरिकन डॉलर्सची ‌बक्षिसे वाटली जातील. भारतीय रुपयात ही रक्कम चक्क ३५९२ कोटी इतकी होत आहे. ही एकूण रक्कम टी२० विश्वचषकातील बक्षीस रकमेच्या आकड्यापेक्षा कितीतरी अवाढव्य आहे.

हेही वाचा :  भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी, ४ वर्षांची घातली बंदी 

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ आणि फिफा यांच्या वतीने सांगण्यात आलेल्या माहितीनुसार विश्वचषक विजेत्या संघाला ३६७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळेल. तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला जवळपास २६१ कोटी रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे टी२० विश्वचषक विजेत्या संघाला आयपीएल विजेत्या संघापेक्षाही कमी रक्कम मिळेल. यावर्षी आयपीएल जिंकणाऱ्या गुजरात टायटन्स संघाला २० कोटी रुपये देण्यात आले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या