इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली जाणार आहे. गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चौथ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये आपापल्या संघांची पहिल्यांदाचा कर्णधार म्हणून धुरा सांभाळणाऱ्या के एल राहुल (लखनऊ) आणि फॅफ डुप्लेसिस (बंगळुरू) यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यापूर्वी काल झालेल्या क्वॉलिफायर १ सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत अंतिम सामना गाठला आहे. त्या सामन्यातही कर्णधार हार्दिक पंड्याने नाबाद ४० धावा करून विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. तर, पराभूत झालेल्या राजस्थानच्या कर्णधाराने म्हणजे संजू सॅमसननेही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत ४७ धावांचे योगदान दिले होते. एकूणच काय तर प्ले ऑफमध्ये पोहचलेल्या चारही संघांच्या कर्णधारांनी वेळोवेळी आपल्या संघासाठी दमदार कामगिरी केली आहे.

फॅफ डुप्लेसिस, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या आणि के एल राहुल हे आयपीएल २०२२ मधील सर्वात चांगली कामगिरी करणारे कर्णधार ठरले आहेत. त्यांनी फक्त कर्णधार म्हणूनच नाही तर एक फलंदाज म्हणूनही धावांचा पाऊस पाडला आहे.

संजू सॅमसन

सर्वात जास्त धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीमध्ये चौथा क्रमांक लागतो तो राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनचा. राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या या हंगामात चमकदार कामगिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघाच्या कामगिरीमध्ये कर्णधार संजू सॅमसनचे महत्त्वाचे योगदान आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसनही आतापर्यंत जबरदस्त लयीत दिसला आहे. त्याने आतापर्यंत ४२१ धावा केल्या आहेत. संजूने वेळोवेळी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे राजस्थानने प्लेऑफमध्ये मजल मारली. पार्थिव पटेलसारख्या वरिष्ठ क्रिकेट खेळाडूंनी संजूच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे.

फॅफ डुप्लेसिस

फॅफ डुप्लेसिस हा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. चेन्नई सुपर किंग्जसारख्या विजेत्या संघातील तो महत्त्वाचा खेळाडू होता. मात्र, यावर्षी सीएसकेने त्याला रिटेन न केल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघमालकांनी त्याच्यावर दाव लावला. शिवाय, विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघांचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही डुप्लेसिसच्या खांद्यावर देण्यात आली. त्याने ही जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार सांभाळली आहे. प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करत असलेल्या डु प्लेसिसने आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये ४४३ धावा केल्या आहेत.

हार्दिक पंड्या

मागच्या आयपीएल हंगामापर्यंत मुंबई इंडियन्सचा सर्वात भरवशाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या हार्दिक पंड्याकडे यावर्षी गुजरात टायटन्स या नवख्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले. गुजरातच्या संघाने आपल्या पहिल्याच हंगामामध्ये जबरदस्त कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने चांगले काम केले आहे. शिवाय, एक अष्टपैलू म्हणूनही तो कमालीचा यशस्वी ठरला आहे. आयपीएल २०२२मध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये १३२.८४ च्या स्ट्राइक रेटने ४५३ धावा केल्या आहेत. तर, गोलंदाजीमध्ये पाच बळी मिळवले आहेत.

के एल राहुल

आयएपीएलमध्ये प्रथमच खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या संघाच्या कर्णधारपदाची धुरा भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊच्या संघाने चमकदार कामगिरी करत प्ले ऑफपर्यंत मजल मारली आहे. फलंदाज म्हणून कर्णधार राहुलने १४ सामन्यांत ५३७ धावा केल्या. ज्यामध्ये दोन शतकांसह तीन अर्धशतकांचाही समावेश आहे.