ओसाका, नदालची विजयी घोडदौड

ओसाकाला पुढील फेरीत स्वित्र्झलडच्या १३व्या मानांकित बेलिंडा बेंकिक हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

गतविजेत्या नाओमी ओसाका हिने महिला टेनिसचे भवितव्य मानल्या जाणाऱ्या १५ वर्षीय कोको गॉफ हिचा सहज पराभव करत विजयी घोडदौड कायम राखली. स्पेनच्या दुसऱ्या मानांकित राफेल नदाल यानेही कोरियाच्या येओन चुंग याचा पाडाव करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळवले.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ओसाकाने अमेरिकेच्या गॉफ हिला अवघ्या ६५ मिनिटांत ६-३, ६-० असे हरवत विजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने कूच केली आहे. कोको गॉफ हिने घरच्या मैदानावर तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारत सर्वाची मने जिंकली होती. नोव्हाक जोकोव्हिचने तिला ‘नवी सुपरस्टार’ अशी उपाधी दिली होती तर सेरेना विल्यम्सने तिची ‘महिला टेनिसचे भवितव्य’ अशी स्तुती केली होती. अ‍ॅना कुर्निकोव्हा (१९९६) नंतर अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत खेळणारी गॉफ ही सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. ओसाकाला पुढील फेरीत स्वित्र्झलडच्या १३व्या मानांकित बेलिंडा बेंकिक हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आजारीपणामुळे अ‍ॅनेट कोन्टावेट हिने माघार घेतल्यामुळे बेंकिकला तिसऱ्या फेरीत पुढे चाल देण्यात आली.

तीन वेळा अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या नदालने दक्षिण कोरियाच्या हेओन चुंग याला ६-३, ६-४, ६-२ असे सहज नमवले. दुसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाल्यावर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर नदालने कोर्टवर दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या मानांकित नदालला आता उपांत्यपूर्व फेरीत मजल मारण्यासाठी २०१४ च्या विजेत्या मारिन चिलिच याच्याशी दोन हात करावे लागतील. नदालने गेल्या वर्षी दुखापतीच्या कारणास्तव हुआन मार्टिन डेल पोट्रोविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घेतली होती. २२व्या मानांकित चिलिचने चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यांत जॉन आयनेरचा ७-५, ३-६, ७-६ (८/६), ६-४ असा पराभव केला होता.

सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह याने साडेतीन तास रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत स्लोव्हेनियाच्या अल्जाझ बेडेने याला ६-७ (४/७), ७-६ (७/४), ६-३, ७-६ (७/३) असे हरवत चौथी फेरी गाठली. रशियाच्या आंद्रे रुबलेव्ह याने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिऑस याचे आव्हान ७-६ (७/५), ७-६ (७/५), ६-३ असे परतवून लावले. फ्रान्सच्या गेल माँफिल्सला पाच सेटपर्यंत कॅनडाच्या डॅनिल शापोव्हालोव्हचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. अखेर ६-७ (५/७), ७-६ (७/४), ६-४, ६-७ (६/८), ६-३ असा विजय मिळवत माँफिल्सने चौथ्या फेरीत प्रवेश केला.

महिलांमध्ये, कॅनडाची युवा टेनिसपटू बियांका आंद्रेस्कू हिने दोन वेळा अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावणाऱ्या कॅरोलिन वॉझ्नियाकीला ४-६, ४-६ असा घरचा रस्ता दाखवला. विम्बल्डन विजेत्या सिमोना हॅलेप हिला हरवत सर्वानाच आश्चर्याचा धक्का देणाऱ्या अमेरिकेच्या टेल टाऊनसेंड हिने रोमानियाच्या सोराना सिर्स्टिया हिला ७-५, ६-२ असे हरवून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

पुन्हा एकदा चौथ्या फेरीत पोहोचल्याचा आनंद होत आहे. हेओन चुंगने कडवी लढत दिली. मी अधिकाधिक आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी मला काही सामन्यांत विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. पण यावेळी मी सर्व आव्हानांसाठी सज्ज आहे. – राफेल नदाल, स्पेनचा टेनिसपटू

ओसाकाने अभूतपूर्व खेळ केला. या सामन्यातून मी बरेच काही शिकले आहे. ओसाका ही जगातील अव्वल क्रमांकाची खेळाडू असल्यामुळे या स्तरावर पोहोचण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे, याची कल्पना आहे.    – कोको गॉफ, अमेरिकेची टेनिसपटू

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The us open tennis tennis tournament akp