‘एमसीसी’चे नवे धोरण

लंडन : स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘बॅट्समन’ऐवजी ‘बॅटर’ हा शब्द त्वरित अमलात आणावा, अशी घोषणा बुधवारी मेरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) केली आहे.

‘एमसीसी’च्या नियम उपसमितीने चर्चा करून हा प्रस्ताव समितीकडे सादर केल्यानंतर तो मंजूर करण्यात आला. स्त्री-पुरुष समानतेसाठी त्रयस्थ शब्द उपयोगात असायला हवेत. त्यामुळेच हा निर्णय तातडीने अमलात आला, असे ‘एमसीसी’ने म्हटले आहे.

काही प्रसारमाध्यमे आणि संघटना आधीपासूनच ‘बॅटर’ हा शब्द वापरतात. याआधी २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) चर्चा करून महिला क्रिकेटच्या दृष्टीने काही शब्दावली निश्चित करण्यात आली. पण त्यावेळी ‘बॅट्समन’ आणि ‘बॅट्समेन’ हे शब्द त्यात कायम ठेवण्यात आले होते. परंतु आता एकवचनी ‘बॅटर’ आणि अनेकवचनी ‘बॅटर्स’ हे दोन शब्द यात समाविष्ट केले आहेत.