ग्रां.प्रि. जिंकण्यासाठी संघ आदेशाची पायमल्ली करण्यास कचरणार नाही. अव्वल स्थान राखण्यासाठी मलेशियन ग्रां.प्रि.मध्ये जसे वागावे लागले तशीच कृती करेन, असे उद्गार रेड बुलचा शर्यतपटू सिबॅस्टिन वेटेलने काढले. वेटेलच्या या उद्गारांनी वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मलेशियन ग्रां.प्रि. शर्यतीत वेटेलने आघाडी मिळवण्यासाठी संघ व्यवस्थापनाचा आदेश झुगारून देत संघ सहकारी मार्क वेबरला मागे टाकले. वेटेलच्या या कृतीने त्याच्यावर जोरदार टीका झाली. या घटनेने वेबर आणि वेटेल यांच्यातले आधीच दुरावलेले संबंध अधिकच बिघडल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे मलेशियन ग्रां.प्रि. मधील कृत्याबद्दल वेटेलने माफी मागितली होती. वेबरला मागे टाकू नये ही सूचना शर्यतीच्या अंतिम टप्प्यात ऐकल्याचे वेटेलने सांगितले. पण मला हे समजले नाही आणि वेबर ही शर्यत जिंकण्यासाठी लायक शर्यतपटू नव्हता, असे उद्गार वेटेलने काढल्याने वाद चिघळला होता.
मी तो आदेश नीट ऐकला असता आणि त्यानुसार कृती केली असती तर वेबरला पहिले स्थान पटकावू दिले असते आणि मी दुसऱ्या स्थानावर समाधान मानले असते. मी त्या संदर्भात विचार केला तर मला वाटते, मी पुन्हा तीच कृती करेन.
संघ सहकारी असूनही वेबरशी दुरावलेल्या संबंधांबाबत विचारले असता वेटेलने सांगितले, स्पष्टच बोलायचे तर मला त्याच्याकडून फारसा पाठिंबा मिळत नाही. मला संघाचा पाठिंबा आहे आणि संघाने आम्हाला दोघांना समजून घेतले आहे. शर्यतपटू म्हणून मला वेबरबद्दल आदरच आहे. मात्र ४ ते ५ वेळा तो संघाची मदत करू शकला असता, पण त्याने तसे केले नाही.