भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. विराट कोहलीनं आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या निर्णयावर क्रिकेट विश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय संघातील माजी अनुभवी अष्टपैलू खेळाडू मदनलाल यांनी विराटच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

मदनलाल यांनी विराट कोहलीच्या टी -२० मधील कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. विराटवर कर्णधारपद सोडण्याचा कोणताही दबाव नव्हता असे मदनलाल यांनी म्हटले आहे. हा सर्व निर्णय कामाच्या ओझ्याबद्दल आहे असे त्यांनी म्हटले. कोहलीच्या या विराट निर्णयावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मदनलाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“त्याच्यावर असा कोणताही दबाव नव्हता आणि मी त्याच्या निर्णयाचे कौतुक करतो. तो आज क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आयपीएल) कर्णधारही आहे. कामाचा ताण लक्षात घेता हा त्याचा चांगला निर्णय आहे. तो सध्या त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर आहे, जे त्याच्यासाठी आणि संघासाठी चांगले आहे,” असे मदनलाल यांनी म्हटले आहे.

‘सचिन तेंडुलकरनेही दबावाखाली कर्णधारपद सोडले होते असे विचारण्यात आल्यावर मदनलाल यांनी भाष्य केलं आहे. कोहलीने “कर्णधारपद सोडले नाही कारण त्याने एक संघ तयार केला आहे आणि भारतीय संघाला कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर नेले आहे, म्हणून विराटने दबावाखाली कर्णधारपद सोडलेलं नाही. हे सर्व कामाच्या ओझ्याबद्दल आहे आणि प्रत्येकावर दबाव आहे आणि आपल्याला त्याला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. सध्या रोहित शर्मा टी -२० कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार आहे आणि भविष्यात भारतीय संघाचा पुढील कर्णधार केएल राहुल असू शकतो,” असे मदनलाल यांनी म्हटले आहे.

मदनलाल हे राहुलला टी -२० संघाचा कर्णधार बनवण्याच्या विरोधात होते. रोहित आधीच कर्णधारपादच्या रांगेत आहे आणि त्याच्या जागी या क्षणी इतर कोणालाही कर्णधार बनवले जाऊ नये, यामुळे संघातील वातावरण खराब होईल आणि त्यासाठी राहुलला उपकर्णधार बनवता येईल, असे मदनलाल यांनी म्हटले.